Nanded News : पुढील काही दिवसांत मान्सून (Monsoon) दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाच्या दृष्टीने मशागती पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांकडून बी-बियाणे देखील खरेदी करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके औषधे खरेदी करावेत, असे आवाहन नांदेडच्या जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी भाग्यश्री भोसले यांनी केले आहे. 


शेतकऱ्यांनी बनावट, भेसळयुक्त बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडून पक्क्या पावतीसह खरेदी करावेत. पावतीवर शेतकऱ्याची व विक्रेत्याची स्वाक्षरी व मोबाईल नंबरची नोंद करुन पीक निघेपर्यंत पावती सांभाळून ठेवावी. खरेदी केलेल्या बियाणाचे वेष्टन, पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणाची पॉकेट सिलबंद असल्याची खात्री करावी. 


बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पॉकिटावरची अंतिम मुदत पाहून घ्या व सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता घरी तपासणी करुन पेरणी करावेत. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. किटकनाशके अंतिम मुदतीच्या आत असल्याची खात्री करावी. विक्री केंद्रावर भरारी पथकाचे फोननंबर दिलेले आहेत. अडचणी सोडविण्यासाठी फोनवर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषि विकास अधिकारी यांच्यावतीने करण्यात आले आहे.


वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज करावे...


दरम्यान राज्यात मुख्यमंत्री सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना राबविण्याबाबत 29 जून 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्याचा अर्ज पुढील तपशिलाप्रमाणे करावा. या योजनेचा अर्ज करण्यासाठी सेतूसुविधा केंद्र, गावातील कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. विशेष म्हणजे यासाठी अर्जदार शेतकऱ्यांकडे स्वत:च्या नावावर किमान 0.60 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक. अर्जदार शेतकऱ्यांची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक आहे. अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे अथवा भात खाचरातील बोडी किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकासाठी शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.


इतर महत्वाच्या बातम्या: 


भंडाऱ्यात धान खरेदी केंद्राअभावी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट, शासकीय दर प्रती क्विंटल 2040 रुपये तर व्यापारी देतोय 1600 रुपये