Agriculture News : जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांचा (Farmer) योग्य सन्मान व्हावा, त्यांच्या शेती उपज मालाला योग्य दर मिळावा, यासाठी राज्य सरकारने जिल्ह्यात 242 धान खरेदी केंद्र मंजूर केले आहेत. मात्र, त्यातील बहुतांश: केंद्र सुरु झालेली नाहीत किंबहुना अनेक केंद्र हे केवळ कागदोपत्री सुरु दाखवण्यात आल्याने भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचे धान नाईलाजाने व्यापाऱ्यांना विकावे लागत आहे. शासनाकडून प्रति क्विंटल 2040 रुपये दर दिला जातो. मात्र, इथले व्यापारी शेतकऱ्यांचे धान विकत घेताना केवळ 1600 ते 1700 रुपये देतात. व्यापारी बळीराजाची एकप्रकारे थट्टा करुन त्यांची आर्थिक फसवणूक करत असल्याचे धक्कादायक चित्र सध्या भंडाऱ्यातील तुमसर बाजार समितीत (Tumsar Krushi Utpanna Bazar Samiti) बघायला मिळत आहे.
धान खरेदी केंद्र कागदोपत्री मंजूर, प्रत्यक्षात धान खरेदी सुरु नाही
भंडारा जिल्ह्यात धानाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. जिल्ह्यात सुमारे दीड लाखांहून अधिक शेतकरी धानाचं उत्पादन घेतात. आता खरीप हंगामाची लगबग सुरु झालेली आहे. अशात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैशाची गरज भासते. हे असले तरी शेकडो शेतकऱ्यांनी उन्हाळी धानाचं घेतलेलं उत्पादन विकून त्याचा आर्थिक मोबदला चांगल्या प्रकारे मिळावा, यासाठी शासनाने जिल्ह्यात 242 धान खरेदी केंद्र मंजूर केले आहे. मात्र असे असले तरी, त्यातील काही धान केंद्रांचा अपवाद वगळता अनेक धान केंद्र हे कागदोपत्री सुरु दाखवून अद्यापही अनेक केंद्रांवर धान खरेदी सुरु झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आता आर्थिक कुचंबना होत आहे.
शेतकऱ्यांनी धान तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ठेवले
शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी सुरुवातीला शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागते. जिल्ह्यात शासकीय दप्तरी 242 धान खरेदी केंद्र सुरु झाले असले तरी अद्यापही अनेक केंद्रांवर शेतकऱ्यांच्या नोंदणी सुद्धा झालेल्या नाहीत. त्यातच शेतीच्या हंगामासाठी शेतकऱ्यांनी आता धान विक्रीसाठी काढले आहे. घरात धानसाठा ठेवण्यासाठी जागा नसल्याने शेतकऱ्यांनी त्यांचा धान तुमसरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आणून ठेवला आहे. धान खरेदी केंद्र सुरु न झाल्याने शेतकऱ्यांच्या असहाय्यतेचा गैरफायदा व्यापारी उचलत असल्याचे चित्र तुमसरमध्ये पाहायला मिळत आहे.
शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी
पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना सुरु केली आहे. याच धर्तीवर आता राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मात्र भंडारा जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र सुरु न झाल्याने व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होत आहे. हा सर्व प्रकार शेतकऱ्यांच्या हक्काची बाजारपेठ असलेल्या बाजार समितीच्या आवारातच होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आता होत आहे. तर बाजार समिती प्रशासनाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं धान उत्पादन निघाल्याने त्यांना जागा उपलब्ध करुन दिल्याचं सांगतात.