Maharashtra : फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूसची प्रत्येकजण वर्षभर आतुरतेने वाट पाहात असतो. मूळचा कोकणातला हा आंबा प्रत्येकालाच याची चव चाखता येत नाही. बाजारातही कोकणच्या तोडीचे आंबे उपलब्ध नसतात. त्यामुळे अनेकांना मनाला मुरड घालावी लागते. पण, आता मात्र, आंबा प्रेमींची ही समस्या दूर होणार आहे. कारण, आता मनसोक्त हापूस कोणत्याही शहरात बसून ऑनलाईन मागवता येणार आहेत. अॅमेझॉन फ्रेशवर आता हापूस देखील उपलब्ध असणार आहे. त्यामुळे घरबसल्या हापूस मागवता येणार आहे. केवळ अॅमेझॉनच नाही तर बिग बास्केट, किशान कनेक्ट, टाटा फ्रेश सारख्या कंपन्या देखील यामध्ये उतरल्या असून ऑनलाईन हापूसची सोय आता या वेबसाईटवर देखील उपलब्ध झाली आहे. रत्नागिरीतील मिरजोळे येथे अॅमेझॉननं संकलन केंद्र सुरू केले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 20 शेतकरी यामध्ये जोडले गेले आहेत. आतापर्यंत दोन दिवसांत तब्बल 800 डझन आंबा खरेदी केला गेला आहे. जवळपास 185 ते 225 ग्रॅमपर्यंतचे पूर्णपणे पिकलेले फळ अॅमेझॉन शेतकऱ्यांकडून खरेदी करत आहे. याबरोबरच टाटा फ्रेश, बिग बास्केट, किसान कनेक्ट सारख्या कंपनी देखील आता कोकणातील हापूस ऑनलाईन उपलब्ध करून देत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात हापूसचे 65 हजार हेक्टर क्षेत्र असून अंदाजे उत्पादन दोन लाख टनच्या घरात आहे. त्यातून वार्षिक 200 कोटींच्या घरात उलाढाल होते. मुख्य बाब म्हणजे अॅमेझॉनसारखी कंपनी ऑनलाईन हापूस विकणार असल्याने त्याचा फायदा नक्कीच कोकणातील शेतकऱ्यांना होणार आहे. 


सध्या हापूसची स्थिती :


सध्याचा हापूसचा दर हा 800 ते 1000 रूपये प्रति डझन इतका आहे. अर्थात तो सर्वसामान्यांना परवडणारा नाही. लांबलेला पाऊस, गायब झालेली थंडी, वातावरणात वारंवार झालेले बदल, वाढता उष्मा यामुळे हापूसचा दर सध्या तरी वाढता आहे. पण, असं असलं तरी हापूसची मागणी मात्र वाढतच आहे. कोकणात अद्याप देखील अवकाळी पाऊस पडत असून त्याचा परिणाम हापूसवर होत आहे. दरम्यान, 5 मे नंतर बाजारात मोठ्या प्रमाणात हापूस दाखल होईल. त्यामुळे दर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे दर सर्वसामान्यांना परवडणारे असतील अशी माहिती आंबा बागायतदार देतात. त्यामुळे एक गोष्ट मात्र नक्की किमान सर्वसामान्यांना परवडेल असा हापूसचा दर होण्यासाठी किमान 20 ते 25 दिवस आणखी वाट पाहावी लागणार आहे. 


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha