Maharashtra Kesari Kusti Competition 2022 : महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतर अद्याप बक्षिसाची रक्कम मिळाली नाही, अशी खंत सोशल मिडियावर मानाची गदा पटकावणाऱ्या पृथ्वीराज पाटीलनं (Prithviraj Patil) व्यक्त केली आहे. दरम्यान, काल साताऱ्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामाना पार पडला. या सामन्यात कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलनं मानाची गदा पटकावली.
तब्बल 21 वर्षांनी महाराष्ट्र केसरीचं विजेतेपद कोल्हापूरकडे गेलं. कोल्हापूरचा पठ्ठ्या पृथ्वीराज पाटील 2022 चा महाराष्ट्र केसरीचा विजेता झाला. अटीतटीच्या लढतीत पृथ्वीराज पाटीलनं विशाल बनकरचा पराभव करुन महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावलीय अंतिम सामन्यात विशाल बनकरवर त्यानं 5-4 नं मात केली. त्यानंतर कोल्हापूरकरांनी एकच जल्लोष केला. पण अद्याप बक्षीसाची रक्कम मिळाली नसल्यानं व्यथीत झालेल्या पृथ्वीराजनं अखेर सोशल मीडियावर आपली खंत व्यक्त केली आहे.
पाहा व्हिडीओ : महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला रोख बक्षीस दिलं नाही, हाती फक्त गदाच
बक्षिसाची रक्कम ही कुस्तिगीर परिषदेकडून, ती आमची जबाबदारी नाही : महाराष्ट्र केसरीचे संयोजक
पृथ्वीराजची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाल्यानंतर एबीपी माझानं कार्यक्रमाचे संयोजक दिपक पवार यांच्याशी संवाद साधला आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावेळी आपली बाजू मांडताना ते म्हणाले की, ही स्पर्धा भरवताना साताऱ्याच्या तालिम संघानं आडीच ते तीन कोटी रूपये खर्च केले आहेत. बक्षीसाची रक्कम ही नगण्य आहे. मात्र ही बक्षिसाची रक्कम आम्ही द्यावी, असं कुठेच नमूद नाही. तसेच बक्षिसाची रक्कम ही कुस्तिगीर परिषदेकडून दिली जाते. ती आमची जबाबदारी नाही. मात्र त्यांनी मागणी केली तर आम्ही ती रक्कम द्यायला तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
कोण आहे पृथ्वीराज पाटील?
आंतरराष्ट्रीय दर्जावर कुस्ती खेळलेला पृथ्वीराज हा कोल्हापूरच्या मातीत तयार झालेला पैलवान आहे. पृथ्वीराज पाटील हा मूळचा पन्हाळा तालुक्यातल्या देवठाणेचा पैलवान आहे. कोल्हापुरात जालिंदर आबा मुंडे यांच्या शाहू कुस्ती केंद्रात तो लहानाचा मोठा झाला. सध्या पुण्याच्या आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंग सुरु असून अमर निंबाळकर आणि राम पवार त्याचे प्रशिक्षक आहेत. दरम्यान आज पृथ्वीराज जिंकल्याने 21 वर्षानंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीचा मान मिळाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :