Nashik Crime : ऑनलाईन फसवणुकी (Online Fraud) बाबत सायबर पोलिसांकडून (Cyber Police) सातत्याने जनजागृती होत असताना देखील फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच गेल्या काही वर्षात क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली सामान्य नागरिकांना गंडा घालण्याचे प्रकार वाढत आहेत. क्रिप्टो करन्सी मिळवण्याच्या नादात नाशिक शहरातील पंधरा जणांची चार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचेसमोर आले आहे. 


फेक वेबसाईट आणि अँपच्या माध्यमातून देशभरात फसवणुकीचे पेव फुटले आहेत. यात सामान्य नागरिकांसह सुशिक्षित तरुण देखील जाळ्यात ओढले जात आहेत. अनेकजण दुप्पट परतावा मिळावा म्हणून कोणत्याही वेबसाईट (Fake Website), अँपची शहनिशा न करता व्यवहार करत असल्याचे या घटनांमधून अधोरेखित होत आहे. नाशिकमधील काही नागरिक याला बळी पडले असून जवळपास चार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीतून समोर आले आहे. या प्रकरणातील संशयितांनी वेबसाईट आणि अँपच्या (Crypto Currency) माध्यमातून नाशिक शहरातील गुंतवणूकदारांना गंडा घातला आहे. 


याप्रकरणी युवराज  गायकवाड-पाटील यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पाटील यांच्या फिर्यादीनुसार, संशयित मोहम्मद हबीब मोहम्मद नीफ आणि मोहम्मद अब्बास, हम्मद युसूफ या संशयितांनी 2021 मध्ये त्यांच्यासह इतर गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. याबाबत दाखल गुन्ह्यानुसार आत्तापर्यंत 15 गुंतवणूकदारांची चार कोटी 18 लाख 53 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न होत आहे. संशयितांनी संगनमत करून युवराज यांच्यासह त्यांचे मित्र व इतरांना बक्षिसे, लक्झरी कार, विदेश यात्रा आणि सहा महिन्यांत गुंतवणुकीच्या दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी सुरुवातीस संशयितांनी गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानंतर सहा महिन्यांनी


संशयितांनी एक वेबसाईट आणि अँप तयार करण्यास भाग पाडले. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी लाख रुपये ॲपवर संकेतस्थळावर गुंतवले मात्र त्यांना अपेक्षित परतावा मिळाला नाही त्याचबरोबर गुंतवलेली रक्कम देखील परत मिळाले नाही. वारंवार चौकशी करूनही संबंधितांना प्रतिसाद मिळाला नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला आहे. 


वेळीच सावध व्हा.... 


दरम्यान संशोधकांनी गुंतवणूकदारांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी ॲप सुरू केले होते या ॲपवरून गुंतवणूकदारांना यूपीआय सारखे आर्थिक व्यवहार करता येत होते मात्र हे ॲप देखील सहा महिन्यात बंद करून संशयित पसार झाले अवघ्या वर्षभरात या संशयितांनी कोट्यवधी रुपयांना गंडा घातला आहे. त्यामुळे झटपट पैसे कमावण्याच्या नादात आहे ती जमापुंजी गमावली आहे. दरम्यान फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ज्या गुंतवणूक दारांची फसवणूक झाली असेल त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आले आहे.