Farmer Viral Video: आजपर्यंत पोलिसांनी अनेकांवर छापे टाकले असतील, अनेक जुगारी ताब्यात घेतले असतील. पण त्यांनी हजार-दोन हजार रुपयांचे जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. मात्र आम्ही शेतकरी पीक लावून लाखोंचा जुगार लावत असतो, त्यामुळे आम्हाला देखील अटक करा असे म्हणत आपलं दुःख मांडणाऱ्या एका शेतकऱ्यांच्या भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhaji Nagar) वैजापूर तालुक्यातील बोरदहेगाव येथील शेतकऱ्याचा हा व्हिडिओ आहे.
जुगार खेळणे हा कायद्याने गुन्हा आहे. मी सुद्धा शेतात कांदे पिकावर जुगार खेळलो म्हणून मला जेल मध्ये टाका अशी भावनीक व्हिडीओ तालुक्यातील बोरदहेगाव येथील शेतकऱ्यांने सोशल मिडियावर पोस्ट केल्याने या व्हिडीओची चांगलीच चर्चा होत आहे."पोलीस अधीक्षक मॅडम तुम्ही दररोज अवैध दारू, मटका व जुगार खेळणाऱ्यांची धरपकड करत असता, परंतु मी काळया मातीत कांदे पिकावर तब्बल चार लाखांचा जुगार खेळलो. मात्र, अवकाळी पावसाने माझ्या 1200 क्विंटल कांद्याचा अक्षरक्ष: लाल चिखल केला आहे, त्यामुळे आता मला पण अटक करा असे म्हणत या शेतकऱ्याने आपलं दुःख व्यक्त केले आहे. तर ज्ञानेश्वर उगले (रा.बोरदहेगाव) असे नुक्सानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.
उगले हे बोरदहेगाव येथील शेतकरी असून आपल्या बंधुंसोबत एकत्रित कुटुंबात राहतात. त्यांचे सर्वच कुटुंब शेती करून आपली उपजीविका भागवत असे. दरम्यान यावर्षी त्यांनी रब्बी हंगामात साडेपाच एकर क्षेत्रावर कांदे लावले होते. मेहनतीने पिकवलेले कांदे त्यांनी शनिवार काढले. मात्र शेतात कांदे भरत असताना अचानक वादळी वाऱ्यांसह आलेल्या मुसळधार पावसाने काढलेले कांदे हे पूर्ण भिजले. तर निम्म्याहून अधिक कांदे हे शेतातच असल्याने त्यांनी ट्रॅक्टर द्वारे कांदे भरण्याचा प्रयत्न केला. पण काही तासात तब्बल 1200 क्विंटल कांद्याचे डोळ्यासमोर चिखल झाले. या पिकासाठी रात्र-दिवस कष्ट घेतले. संपूर्ण कुटुंबाने अक्षरशः राबराबून पिकाची काळजी घेतली. एवढच नाही तर उतपन्न चांगले व्हावे यासाठी दर्जेदार बियाने, खत आणले यासाठी चार लाखाहुन अधिक खर्च केला. मात्र त्याच पिकाचे डोळ्यासमोर चिखल होताना पाहून ज्ञानेश्वर उगले यांचा संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी आपल्याला अटक करण्याची मागणी केली.
व्हिडिओ..
गारपिटचे एक रुपयाची मदत मिळालेली नाही
गेल्या एक वर्षापासून तालुक्यात सतत झालेल्या पाउसाचे व मागील गारपिटचे एक रुपयाची मदत मिळालेली नाही. केवळ अधिकारी पंचनामेच्या नावाने कागद काळे करतात. त्यामुळे माझ्या शेतात झालेल्या नुकासानीटे स्वतः मी व्हिडीओ बनवले व ज्या पद्धतीने मी चार लाखांचा जुगार कांद्यावर खेळलो त्याचे व्हिडीओच्या माध्यमातून लाईव्ह कथन करून मला अटक करा अशी विनवणी पोलिस अधीक्षक मॅडम व तहसीलदार यांना केल्याची शेतकरी ज्ञानेश्वर उगले यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या: