Chili Price: लाल मिरचीच्या बाजारात दर वाढीचा ठसका पाहायला मिळत असून, सद्या लाल मिरचीचे दर 20 ते 30 रुपयांनी वाढले आहेत. तर आगामी दोन महिन्यात हे दर 200 ते 650 किलोंपर्यंत जाणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. जानेवारी महिन्यापासून  हिरव्या मिरचीचे उत्पादन घटल्याने लाल मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे याचा नक्कीच ग्राहकांना फटका बसणार आहे. 


गेल्या वर्षीच्या तुलनेत बाजारपेठत मिरचीची आवक कमी झाली असल्याचे चित्र बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर सद्या बाजारात बेडगी मिरची 450 ते 460 रुपये प्रतिकिलो मिळत आहे. गुंटूर मिरची 200 ते 230 रुपये किलो, चपाटा 360 रुपये किलो, तेजा मिरची 230 रुपये प्रतिकिलो मिळत आहे. तर रसगुल्ला मिरची हि सर्वाधिक महाग म्हणजेच 600 रुपये किलो मिळत असल्याचे चित्र बाजारात आहे. या दरात आणखी वाढ सुरूच राहणार असून पुढील दोन महिने लाला मिरचीच्या बाजारात तेजी पाहायला मिळणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे. 


आवक कमी झाल्याने दरवाढ... 


अवकाळी पावसाळ्याचा फटका इतर पिकांप्रमाणे मिरचीला सुद्धा बसला होता. त्यामुळे जानेवारी महिन्यात निघणाऱ्या मिरचीची आवक घटली. त्यांनतर बाजारात सतत मिरचीची हवी तशी आवक पाहायला मिळाली नाही. त्यामुळे त्याचे परिणाम आता जाणवू लागले असून, लाल मिरचीच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. ही वाढ अजून तरी पुढील दोन महिने सहन करावी लागणार आहे. 


इतर राज्यातून आयात... 


राज्यातल्या अनेक भागात मिरचीचे यावर्षी उप्तन्न घटल्याचे पाहायला मिळाल्याने, आवक सुद्धा कमी झाली आहे. त्यामुळे आता कर्नाटक,मध्य प्रदेश, तेलंगणसह आदी राज्यांतून मिरची आयात करावी लागत आहे. किलोमागे 20-30 रुपयांची वाढ पाहायला मिळत आहे. तर मिरचीचे भाव वाढल्याने पावडरचे दर सुद्धा वाढले आहेत. 


ग्राहक घटले.. 


याबाबत बोलताना औरंगाबादचे ममता मिरचीचे मालक मोहसीन शेख म्हणले की, लाल मिरचीचे दर वाढल्याने मोठ्याप्रमाणत ग्राहक घटले आहेत. तर बाजारात मिरचीचे आवक सुद्धा घटली आहे. सद्या रसगुल्ला मिरचीचा तुटवडा जाणवत आहे. कारण हि मिरची तिखट नसते आणि विदेशात सुद्धा खूप मागणी असते. त्यामुळे ह्या मिरचीचे दर 600 रुपये प्रतिकिलोपर्यंत गेले आहेत.  - मोसीन शेख, ममता मिरची