Agriculture News : सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला. परतीच्या पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालं आहे. अशातच हवामान विभागानं (Meteorological Department) 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान मान्सून महाराष्ट्राचा निरोप घेणार असल्याची माहिती दिली आहे. मान्सून वेळेत परतत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी आता नेमकी कोणती कामं करावीत. पिकांच्या बाबतीत शेतकऱ्यांनी काय नियोजन करावं यासंदर्भातील माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली आहे. सध्या परतीच्या पावसासाठी अनुकूल वातावरण असल्यानं पिकांच्या नुकसानीची शक्यता धूसर असल्याचे माणिकराव खुळे यांनी सांगितलं.


शेतकऱ्यांनी नेमकं काय नियोजन करावं


हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार 5 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत मान्सून परत फिरणार आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांनी शेतीच्या कामासाठी लगबग करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी कांद्याचे बियाणे टाकण्यास काही हरकत नाही. साधारणात: बियाणे टाकल्यापासून 45 दिवसांमध्ये कांद्याची रोपे लागवडीसाठी तयार होता. त्यामुळं आता कांद्याचे बी टाकले तरी चालेल अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. 


द्राक्ष आणि डाळिंब छाटणी करावी


द्राक्ष बागेची छाटणी शेतकऱ्यांनी केली तरी चालेल. छाटणी करण्यास अडचण काही नाही. कारण, सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. पाऊस निरोप घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळं द्राक्ष बागांच्या छाटणीला सुरुवात केली तरी चालेत. त्याचबरोबर डाळींबाची पानगळणी केली तरी चालेल. कारण आता जर पानाची छाटणी सुरु केली तर मार्च ते एप्रिलपर्यंत पिक बाजारात येईल, त्यामुळं शेतकऱ्यांना त्याचा फायदाच होईल अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. 'हस्त बहार' नियोजन करण्यास सध्याचा काळ योग्य जाणवत आहे. सध्याची पानगळणी कदाचित भविष्यातील फळतोडणी कदाचित गारपीट कालावधीच्या बाहेर घेऊन जाईल असेही वाटत असल्याचे खुळे यावेळी म्हणाले.


खरीपातील पिकांच्या काढणीचे नियोजन करावं


खरीपातील आगाप मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, कडधान्ये ही पिके परतणीच्या स्टेजमध्ये असण्याची शक्यता आहे. त्यांच्या काढणीच्या तसेच पशुधनासाठीच्या मुरघास प्रक्रिया आणि साठवणीच्या नियोजनासाठीचा वातावरणाच्या नजरेतून सध्याचा काळ योग्य जाणवत आहे. त्याचे योग्य ते नियोजन करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात करावी अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. सोयाबीन आणि बाजरीचे पिक काढणी करण्याच्या स्टेजमध्ये आहे. त्यासाठी पूर्वनियोजन करावे लागते. विशेषत: मजूर लावून करायची असेल तर त्याचे नियोजन मशीननं काढणी करायची असेल तर त्याचे शेतकऱ्यांनी आत्ताच नियोजन करावं असे खुळे यांनी सांगितलं.


मुरघास तयार करण्यासाठी मकेची काढणी करावी


आगाप मका आता काडणी करायला सुरुवात केली तरी चालेल. ज्या शेतकऱ्यांना मुरघास तयार करायचा आहे, असा शेतकऱ्यांनी मकेची तोडणी करावी असे खुळे यांनी सांगितले आहे. तर बाजरी, भुईमूग, सोयाबीन, ही पिकं 15 ऑक्टोबरच्यानंतर काढणीसाठी येणार आहेत, त्यादृष्टीनं शेतकऱ्यांनी आत्तापासूनच नियोजन करावं अशी माहिती देखीळ खुळे यांनी दिली आहे.


राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस


दरम्यान, राज्यात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. सुरुवातील जून महिन्यात पावसानं उघडीप दिली होती. त्यानंतर मात्र, जुलै आणि ऑगस्टमध्ये राज्यात पावासानं धुमाकूळ घातला होता. या पावासामुळं राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. अशातच आता हवामान विभागानं एक महत्त्वाची माहिती दिली आहे. 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरणार आहे. तर 8 ऑक्टोबरला मुंबईतून मान्सून निरोप घेणार असल्याची माहिती हवामान विभागानं  दिली आहे. दरम्यान, 26 सप्टेंबरपासून (सोमवार) महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. परतीच्या प्रवासात उत्तर मान्सून सक्रिय झाला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: