Nandurbar News : राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी (Heavy Rain) झाली आहे. याचा खूप मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. या पावसामुळं शेती पिकं वाया गेली आहेत. तर अनेक ठिकाणी जमिनी खरवडून गेल्या आहेत. नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात देखील अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत अन्यथा, रस्त्यावरील संघर्ष करणार असल्याचा इशारा शिवसेनेनं (Shivsena) दिला आहे. त्वरीत पंचनामे न झाल्यास मंत्र्यांना जिल्ह्यात फिरु देणार नसल्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार आमश्या पाडवी (Aamshya Padavi) यांनी राज्य सरकारला दिला आहे. 


गेल्या महिनाभरात नंदूरबार जिल्ह्यात अतिवृष्टीमुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं वाया गेली आहेत. तसेच अनेक ठिकाणी जमिनी देखील खरवडून गेल्या आहेत. मात्र,अद्यापही पंचनामे झालेले नाहीत. शेतकऱ्यांना त्वरित पंचनामे करुन दिलासा देणं महत्त्वाचे आहे. तरी राज्य सरकार आणि प्रशासन शेतकऱ्यांचे पंचनामे करुन त्यांना मदत देत नसल्यानं नंदूरबार जिल्ह्यातील शिवसेना आक्रमक झाली आहे.




जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी


महिनाभरात नंदूरबार जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये वेचणीला आलेला कापूस खराब झाला आहे. तर दुसरीकडे कापसावर लाल्या रोगासह विविध किडींचा देखील प्रादुर्भाव झाला आहे. तसेच नवापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं भात उत्पादक शेतकऱ्यांचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यामधील शेतकऱ्यांची पिकं देखील नष्ट झाली आहेत. मात्र, अजूनही जिल्हा प्रशासन नुकसानीचे पंचनामे करत नसल्याचे वास्तव समोर आलं आहे. त्यामुळं शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करुन जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे योग्य पद्धतीने नाही झाल्यास जिल्ह्यात रस्त्यावर एकाही मंत्र्याला न फिरु देण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.




...तर जिल्ह्यात एकाही मंत्र्याला फिरु देणार नाही


एकूणच जिल्ह्यातील नुकसानीची तीव्रता पाहून कृषीमंत्र्यासहित मदत आणि पुनर्वसनमंत्र्यांनी जिल्ह्याच्या दौरा करुन शेतकऱ्यांना दिलासा देणे अपेक्षित आहे. मात्र, कोणीही जिल्ह्यात आले नसल्याचे आमदार आमश्या पाडवी यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी पाडवी यांनी राज्य सरकरला इशारा देखील दिला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे योग्य पद्धतीने नाही झाल्यास जिल्ह्यात एकाही मंत्र्याला फिरु देणार नसल्याचा इशारा पाडवी यांनी दिला आहे. त्यामुळं आता त्यांच्या या भूमिकेवर सरकार काय भूमिका घेणार हे पाहमं देखील महत्वाचं ठरणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Rain : राज्यात पावसाचा जोर कमी, आज विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा 'यलो' अलर्ट