अहमदनगर: शेतीत क्षेत्रात शेतकरी (Farmers) सातत्याने नवनवीन प्रयोग करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जात आहे. शेतकऱ्यांसमोर विविध संकट असताना देखील काही शेतकरी उत्तम प्रकारची शेती करत आहेत. कर्जत तालुक्यातील थेरगाव येथील पदवीधर शेतकरी यांनी डाळिबांची (Pomogrannet ) यशस्वी शेती केली आहे. विवेक रायकर यांचे डाळिंब थेट बांगलादेशात निर्यात होत आहेत. डाळिंबाचा रंग, आकार, आणि दर्जा पाहून डाळिंब खरेदी करणारे अनेक व्यापारी याची मागणी करत आहेत. विशेष म्हणजे रायकर यांच्या डाळिंबाला आळेफाटा येथील बाजारात 194 रुपये किलोचा उच्चांकी भाव मिळाला.


दहा गुंठ्यांवर त्यांनी गांडूळ खत प्रकल्प उभारला


 नगर-सोलापूर महामार्गालगत कर्जत तालुक्यात मांदळीजवळ थेरगाव हे गाव आहे. थेरगाव येथील रहिवासी आजीनाथ रायकर यांना शेतीची आवड असल्याने त्यांनी शेतीसाठी खडकाळ माळरान असलेली 20 एकर जमीन निवडली. या जमिनीतून हमखास उत्पन्न काढण्याचा मानस त्यांनी आणि त्यांचे चिरंजीव विवेक रायकर यांनी केला. 20 एकर क्षेत्रावर त्यांनी डाळिंब लागवड केली. लागवड करताना भगवा डाळिंब या वाणाची निवड केली. लागवडीसाठी दोन टप्पे करण्यात आले. सुरुवातीला 10 एकर आणि नंतर 10 एकरवर त्यांनी डाळींब लागवड केली. पाणी उपलब्ध नाही म्हणून सीना नदीवरून सहा किलोमीटरवरून पाईपलाईन केली. शेतात आठ लाख लिटर क्षमतेचा हौद त्यांनी उभारला. ठिबक सिंचनाद्वारे संपूर्ण बागेला पाणी पुरवठा केला. सोबतच जी जनावरे शेतकरी सोडून देतात किंवा कसायाला पाठवतात अशा 100 गायींचा त्यांनी सांभाळ करत त्यांच्यापासून मिळणाऱ्या शेणाचा वापर त्यांनी आपल्या बागेत केला. सोबतच जवळपास दहा गुंठ्यांवर त्यांनी गांडूळ खत प्रकल्प उभारला त्याचाही त्यांना फायदा झाला. अतिशय दर्जेदार फळ त्यांना यामुळे मिळत आहेत दर्जा चांगला असल्याने त्यांच्या फळाला थेट बांगलादेशातून मागणी होत आहे.


दहा एकर क्षेत्रापासून सुमारे 200 टन


रायकर यांच्या बागेत कधीही तणनाशकाची फवारणी केली जात नाही.  लहान मुलांप्रमाणे ते बागेची काळजी घेतात. यामुळे डाळिंबावर रासायनिक औषधांचे फवारणी कमी प्रमाणात करावी लागते. या बागेत गेल्या चार ते पाच वर्षांपासून डाळिंबाचे उत्पादन सुरू आहे. पूर्वी हे प्रमाण कमी होते, परंतु दरवर्षी दहा एकर क्षेत्रापासून सुमारे 200 टन उत्पादन होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. सध्या येथील डाळिंब बागेत फळांची तोडणी सुरू असून यावर्षी आळेफाटा येथे हा माल दिला आहे. डाळिंबाचा आकार रंग आणि गोडी पाहून हा माल आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात करण्यासाठी पात्र ठरला आहे.  तो सध्या बांगलादेशाला पाठवला जात असून सध्या त्यांना 170 ते 200 रुपये दर मिळत असल्याचे विवेक रायकर यांनी सांगितले आहेत.


रायकर यांच्या बागेत जवळपास 40 मजूर काम करत आहेत. ज्या गायी लोक सोडून देतात त्यांचा सांभाळ करून त्यांच्या शेणापासून स्लरी तयार केल्या जातात. या गायींचा सांभाळ करण्यासाठी दोघे मजूर स्वतंत्र ठेवण्यात आले आहेत. रासायनिक खतांचा वापर टाळण्यासाठी आणि आणि उत्तम दर्जाचे फळ मिळवण्यासाठी रायकर यांचा प्रयत्न असतो.  यासाठी विवेक यांचे मामेभाऊ दत्तात्रय ननवरे यांचही त्यांना सहकार्य मिळतं. कर्जत तालुक्याला दुष्काळी भाग म्हणून संबोधले जाते. परंतु रायकर यांनी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून प्रगती साधली आहे.


हे ही वाचा :