Mohammed Shami Gets Bail: भारतीय क्रिकेट संघाचा (INDIAN CRICKET TEAM) वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीला (Mohammed Shami) वर्ल्डकप (ODI World Cup 2023) सुरू होण्यापूर्वीच मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी (19 सप्टेंबर) रोजी पत्नीचा छळ केल्याच्या प्रकरणात मोहम्मद शामीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मोहम्मद शामीच्या पत्नीनं त्याच्या गंभीर आरोप केले आहेत. याच प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान मोहम्मद शामीला अलीपूर कोर्टानं सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शामी कोर्टात हजर राहिला होता, याप्रकरणावरील सुनावणी पार पडली. अखेर सुनावणीअंत अलीपूर कोर्टानं मोहम्मद शामीला जामीन मंजूर केला. दरम्यान, या प्रकरणाच्या सुनावणीपूर्वीच मोहम्मद शामीच्या वतीनं जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. 


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत (ODI) आणि त्यानंतर एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडियाचा भाग असलेल्या मोहम्मद शामीसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. शामीसोबतच त्याचा भाऊ मोहम्मद हसिमचाही जामीन अर्ज न्यायालयानं मंजूर केला आहे. इनसाइड स्पोर्ट्सनं दिलेल्या वृत्तानुसार, शामी आणि त्याचा भाऊ वकील सलीम रहमान यांच्यासोबत कोर्टात हजर झाले आहेत.


मोहम्मद शामीचे वकील सलीम रहमान यांनी सुनावणीबाबत बोलताना सांगितलं की, जामीन मिळाल्यानंतर शामी आणि त्याचा भाऊ हसिम कोर्टात हजर झाले, दोघांनीही जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांची याचिका न्यायालयानं मान्य केली. दरम्यान, शामीची पत्नी हसीन जहाँ हिनं 8 मार्च 2018 रोजी जादवपूर पोलीस ठाण्यात शामी आणि त्याच्या भावावर छळ केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला होता.


ऑस्ट्रेलिया सीरीजमध्ये सर्वांचं लक्ष मोहम्मद शामीकडेच 


मोहम्मद शमीला आशिया चषक 2023 मध्ये फक्त 2 सामने खेळण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये त्यानं एक नेपाळविरुद्ध आणि दुसरा बांगलादेश संघाविरुद्ध खेळला आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये शामीनं आपल्या गोलंदाजीनं सर्वांनाच प्रभावित केलं. आता त्याला विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील सर्व सामने खेळण्याची संधी मिळू शकते. अशा परिस्थितीत शामी आपल्या वेगानं प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखण्यात यशस्वी होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  


नेमकं प्रकरण काय?


टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शामी आणि त्याच्या पूर्वाश्रमीची पत्नी हसीन जहाँ यांच्यातील वाद थेट कोर्टात पोहोचला होता. पूर्वाश्रमीच्या पत्नीनं मोहम्मद शामीवर अनेक गंभीर आरोप केलेत. शामीचे विवाहबाह्य संबंध होते आणि त्यानं हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप हसीन जहाँनं केला आहे. इतकंच नाही तर त्यानं दौऱ्यावर असताना कॉल गर्ल्सला हॉटेल रुममध्ये बोलावल्याचा गंभीर आरोपही हसीननं केला आहे. या प्रकरणात, अलीपूरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयानं 29 ऑगस्ट 2019 रोजी शामीविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं होतं. शामीने मात्र या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिलं. यावेळी न्यायालयानं अटक वॉरंट आणि संपूर्ण प्रकरणातील पुढील कार्यवाहीला स्थगिती देण्याचा निर्णय दिला होता. अखेर अलीपूर न्यायालयात मंगळवारी पार पडलेल्या सुनावणीवेळी मोहम्मद शामीला जामीन मंजूर केला.  


कोण आहे हसीन जहाँ?


हसीन जहाँ एक व्यावसायिक मॉडेल आहे. ती मूळची कोलकाताची आहे. ती कोलकाता नाईट रायडर्सची चीअर लीडर देखील होती. मोहम्मद शामी आणि हसीन जहाँ यांचा विवाह 7 एप्रिल 2014 रोजी झाला होता. या दोघांचा अद्याप घटस्फोट झालेला नाही, परंतु ते दोघे वेगळे राहतात. 2018 मध्ये, मोहम्मद शामीवर त्याची पत्नी हसीन जहाँने मारहाण, अत्याचार, हत्येचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता.