Unseasonal Rain : राज्यावर सध्या अवकाळी पावसाचं संकट आहे. सोमवारी ठाणे, मुंबईसह राज्यात अनेक भागात अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तर राज्यात काही भागात मागील सलग दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु असल्याचं चित्र आहे. यामुळे शेतीपिकांसह, बागायतदारांचंही मोठं नुकसान झालं आहे. केळी, मिरची, डाळिंब, ऊस, कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. काही ठिकाणी जनावरांचाही मृत्यू झाला आहे.


तीन एकर केळीची बाग भूईसुपाट


पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा गावातील शेतकरी राजेंद्र मारूती घाडगे यांची अवकाळी पावसाने तीन एकर केळीची बाग भूईसुपाट झाली. तीन एकरांमधे त्यांनी एकूण तीन हजार पाचशे केळीची झाडे लावली होती. या झाडांना सध्या केळीचे घडही लागले होते. मात्र अचानक आलेल्या पावसाने हे सगळं जमीनदोस्त झालंय. या अवकाळी पावसाने त्यांचं 13 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने  केळी, ऊस, डाळिंब, कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने नुकसानीचे पंचनामे सुरू केलेले नाहीत. त्यामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.


दहा एकर केळीची बाग जमीनदोस्त


सांगवी आष्टी गावातील येथील वादळी वाऱ्याने दहा एकर केळीची बाग जमीनदोस्त झाली आहे. अधिकारी शेतकऱ्यांना उडवा-उडवीची उत्तर देतात. आष्टी तालुक्यातील सांगवी आष्टी येथील शेतकरी रमेश गायकवाड, किसान गायकवाड, नानासाहेब खेडकर, दत्तात्रय खेडेकर,सोमीनाथ खेडकर, सौरभ खेडकर, मधूकर खेडकर या शेतकऱ्यांच्या केळीची बाग वादळी वाऱ्यासह उद्ध्वस्त झाली, यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून अधिकारी गावात येऊन पंचनामे न करता शेतकऱ्यांना उडवा-उडवीचे उत्तर देतात, यामुळे शेतकरी हाताश झाले आहेत. निसर्गही कोपला, अधिकरी चांगली वागणूक देत नाहीत, तर न्याय मागायचा कुणाकडे असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे.


अवकाळी पावसानं लाखो रुपयांची मिरची सडली 


भंडारा जिल्ह्यात धान पीक हे मुख्य उत्पादन असलं तरी आता नगदी पीक म्हणून अनेक शेतकरी बागायती शेतीच्या माध्यमातून मिरचीचं उत्पादन घेऊ लागले आहेत. मागील आठवड्यात भंडारा जिल्ह्याला अवकाळी पावसानं अक्षरश: झोडपून काढलं. या अवकाळी पावसामुळं भात पीक जमीनदोस्त झालं. तर, पालेभाज्यांच्या शेतीलाही मोठा फटका बसला. तर मिरची पिकांनाही नुकसान झाल्याचं चित्र भंडारा जिल्ह्यात बघायला मिळालं. ज्या मिरची उत्पादकांनी मिरचीचं उत्पादन घेतलं किंवा त्या मिरची विक्रीतून ज्या व्यापाऱ्यांनी व्यवसाय करण्याकरिता मिरची खरेदी केली, अशांना या अवकाळी पावसाचा जबर फटका बसला. किंबहुना पावसामुळं मिरची सडली आणि आता या मिरचीला मार्केटमध्ये दर ही मिळणार नाही, अशी भीती आता व्यक्त होत आहे. छोटे व्यापारी किंवा शेतकऱ्याचा विचार केल्यास या अवकाळी पावसामुळं त्यांना पाच ते दहा लाख रुपयांचा फटका बसल्याचं बघायला मिळत आहे.


जोरदार पावसामुळे ऐन उन्हाळ्यात बेनीतुरा नदी प्रवाहीत, 12 जनावरांचा मृत्यू


मागच्या दोन दिवसांत धाराशिव जिल्ह्याच्या काही ग्रामीण भागाला अवकाळी पाऊस, वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटाचा जोरदार फटका बसला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात उमरगा तालुक्यातील बेनीतुरा नदीला पुराचे स्वरूप आले. अवकाळी पावसामुळे ऐन उन्हाळ्यात बेनीतुरा नदी प्रवाहित झाल्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. धाराशिव, उमरगा, लोहारा तसेच कळंब तालुक्यातील गावांतील उन्हाळी पिकांचे, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. 10 गावांना विजांचा फटका बसला आहे. याचा मोठा तडाखा पशुपालकांना बसला असून पावसाच्या थैमानात 12 जनावरांचा बळी गेला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत द्यावी, अशी मागणी आता शेतकऱ्याकडून होत आहे.


भंडाऱ्यातही अवकाळी पावसाची हजेरी


हवामान विभागानं 15 मेपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मध्यरात्री पुन्हा एकदा भंडाऱ्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. मागील दोन दिवसांपासून उन्हाची प्रखरता जाणवू लागली असता, सोमवारी अचानक आलेल्या या पावसानं नागरिकांची होणाऱ्या उकड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील आठवड्यात झालेल्या जोरदार अवकाळी पावसानं भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं असून त्याच्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत.