Lumpy Skin Disease: लम्पी चर्मरोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नांदेड जिल्हा प्रशासनाने लम्पी चर्मरोगावर (Lumpy Skin Disease) नियंत्रण, प्रतिबंध, निर्मुलन करण्यासाठी युद्धपातळीवर नियोजन केले आहे. या अनुषंगाने गोजातीय प्रजातीची सर्व गुरे व म्हशी यांची कोणत्याही ठिकाणाहून ने-आण करणे, बाजार भरविणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांच्या जत्रा भरविणे, प्रदर्शन भरविणे किंवा प्राण्यांना एकत्र आणून कार्यक्रम करण्यास जिल्हा प्रशासनाने प्रतिबंध घातले आहेत. नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
लम्पी चर्मरोगाबाबत नांदेड जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. गोजातीय प्रजातीची सर्व गुरे व म्हशी यांना ठेवण्यात आलेल्या ठिकाणापासून इतर कोणत्याही ठिकाणी त्यांना नेण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याशिवाय, गोवंश प्रजातीची बाधित असलेली कोणतीही जिवंत किंवा मृत गुरे, म्हशींच्या संपर्कात आलेले कोणत्याही प्रकारचे वैरण, निवाऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य यांच्या वाहतुकीस जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली आहे. त्याशिवाय, प्राण्यांचे शव, कातडी किंवा प्राणी नियमित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी मनाई करण्यात आली आहे.
प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरविणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यावर ही बंदी घालण्यात आली आहे. बाजारपेठेत, जत्रेत, प्रदर्शनामध्ये किंवा प्राण्यांच्या अन्य जनावरांमध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गोजातीय प्रजाती प्राण्यांच्या बाधित झालेलया गुरांना व म्हशींना आणणे अथवा त्यासाठी प्रयत्न करण्यास मनाई करण्यात आली आहे.
गुरांचा बाजार बंद
जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी जिल्ह्यातील सर्व बाजार पुढील आदेश होईपर्यत बंद ठेवण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. लम्पी चर्मरोग असल्याने संशयित असलेल्या किंवा संक्रमित किंवा संक्रमित झालेल्या प्राण्यांच्या प्रवेशास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने तपासणी नाक्यावर काटेकोर अंमलबजावणी करण्यास आणि कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
मराठवाड्यात लम्पीचा प्रसार
मराठवाड्यातील (Marathwada) 197 जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 78 जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. मराठवाड्यात 53 गावांमध्ये हा संसर्ग पाहायला मिळत आहे. या आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील सतर्क झाले आहे. औरंगाबादमध्ये 33, जालनामध्ये 7, बीडमध्ये 26, परभणीत 20, लातूरमध्ये सर्वाधिक 102 आणि उस्मानाबाद 9 जनावरे बाधित आहेत. नांदेडमध्ये एकही प्रकरण समोर न आल्याने जिल्ह्यात विशेष खबरदारी घेतली जात आहे.