Hyderabad Liberation Day : 17 सप्टेंबर रोजी हैदराबाद मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो. हा दिवस आता मराठवाडा, तेलंगाणा, कर्नाटकातील विद्यापीठांमध्ये सुद्धा साजरा केला जावा, या संदर्भातील सूचना विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने (UGC) संबंधित विद्यापीठांना, महाविद्यालयांना काल (13 सप्टेंबर) दिल्या आहे. यूजीसीचे अध्यक्ष ए जगदीश कुमार यांनी तेलंगाणा राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंना आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांना आणि मराठवाडा आणि कर्नाटकातील जिल्ह्यांना संबंधित शैक्षणिक संस्थेवर राष्ट्रध्वज फडकवण्याची विनंती केली आहे. या भागातील विद्यापीठ महाविद्यालय 17 सप्टेंबरच्या सकाळी प्रभात फेरी देखील काढू शकतात. या दिवशी उपक्रमांच्या सूचक यादीमध्ये हैदराबाद मुक्ती संग्राम संदर्भात प्रतिष्ठित लोकांचे भाषण, पथनाट्य, प्रदर्शन, सोशल मीडिया जागृती मोहीम, प्रश्नमंजुषा स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रपट प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा इत्यादींचा समावेश असावा, असं यूजीसीकडून सांगण्यात आलं आहे.
असदुद्दीन ओवेसी याचा 'हैदराबाद मुक्ती संग्राम दिन'च्या नावावर आक्षेप
एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी 'हैदराबाद मुक्ती संग्राम दिन' च्या नावावर आक्षेप घेतला आहे. एमआयएमने याबाबत देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना पत्र लिहिलं आहे. 17 सप्टेंबर हा दिवस 'हैदराबाद मुक्ती संग्राम दिन' ऐवजी 'राष्ट्रीय एकता दिन' म्हणून साजरा करण्यात यावा.
हैदराबाद मुक्ती संग्राम
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला खरा, पण मराठवाडा स्वतंत्र होण्यास तब्बल 17 सप्टेंबर 1948 हे वर्ष उजाडावं लागलं. कारण, हैदाराबाद संस्थान खालसा होऊन स्वतंत्र भारतात मराठवाड्याचा समावेश होण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. मराठवाडा स्वतंत्र झाल्याला यंदा 74 वर्षे होत आहेत. हैदराबाद संस्थान हे महाराष्ट्र (8 जिल्हे), आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड अशा राज्यांमध्ये विस्तारलेलं होतं. हैदराबाद संस्थान भारतात सहभागी करण्यात यावं यासाठी प्रचंड मोठी चळवळ उभी करण्यात आली. ही चळवळ स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आली होती. ही चळवळ दडपण्यासाठी निजामाने सशस्त्र मार्ग अवलंबला. त्यासाठी निजामी राजवटीला पाठिंबा देणाऱ्या कासीम रझवी याच्या रझाकार संघटनेचा मोठा हात होता. रझाकार संघटनेने सर्वसामान्य जनतेवर आतोनात अत्याचार सुरु केले होते. त्याचे पडसाद मराठवाड्यातही उमटत होते. त्यातूनच मराठवाडा मुक्ती संग्राम उदयास आला.
भारतीय सैन्याने हैदराबाद संस्थान आणि रझाकार संघटनेला चारही बाजूंनी घेरलं. 13 सप्टेंबर 1947 रोजी भारतीय सैन्याने आपला हल्ला वाढवला. त्यामुळे भारतीय सैन्यासमोर निजामाच्या सैन्याला आणि रजाकारांना नमावं लागलं. अखेर हैदराबाद संस्थान आणि निजामाचा सेनाप्रमुख जनरल अल इद्रीस हा 17 सप्टेंबर 1948 रोजी भारत सरकारला शरण आला. परिणामी निजामालाही शरण यावं लागलं. हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात सहभागी झालं आणि मराठवाडा मुक्त झाला. हे आंदोलन तब्बल 13 महिने सुरु होतं. या कारवाईला 'पोलीस अॅक्शन' असं म्हटलं गेलं. सरदार पटेल यांच्या नेतृत्त्वाखाली राबवलेली ही पोलीस अॅक्शन देशाच्या इतिहासात अजरामर ठरली.
VIDEO : Hyderabad Mukti Sangram Din : 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्याच्या यूजीसीच्या सूचना