Congress President Mallikarjun Kharge : काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) हे आज काँग्रेस अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेणार आहेत. अध्यक्षपदाची धुरा हाती घेण्यापूर्वी दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर खर्गेंच्या अभिनंदनाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष बनल्यानं त्यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर उभा आहे. कारण येत्या काही दिवसांमध्येच अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. यामध्ये काँग्रेसची कामगिरी कशी राहणार, निवडणुकांच्या दृष्टीनं खर्गे नेमकं कसं नियोजन करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


24 वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेर काँग्रेसचं अध्यक्षपद


येत्या काही आठवड्यांमध्येच गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडुकांचं मोठं आव्हान खर्गेंसमोर आहे. त्याचवेळी 2024 ची लोकसभा निवडणूक त्यांच्यासाठी सर्वात मोठी परीक्षा असेल. दरम्यान, आज सकाळी खर्गे सोनिया गांधींसह पक्षाच्या अन्य नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. कर्नाटकातील दलित समाजातील 80 वर्षीय खर्गे यांनी 17 ऑक्टोबर रोजी झालेल्या ऐतिहासिक निवडणुकीत त्यांचे प्रतिस्पर्धी 66 वर्षीय थरुर यांचा पराभव केला होता. पक्षाच्या 137 वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. तब्बल 24 वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीला काँग्रेसचं अध्यक्षपद मिळालं आहे.


आगामी निवडणुकांमध्ये चांगलं काम करण्याचं आव्हान


आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांमध्ये चांगलं काम करण्याचं काँग्रेससमोर मोठं आव्हान आहे. तर राजस्थान आणि कर्नाटकमध्ये पक्षांतर्गत सुरु असलेली धुसपूस पक्षाच्या अडचणीत भर पडली आहे. अशा परिस्थितीत 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पक्षाची एकजूट करणं हे खर्गे यांच्यासाठी मोठे आव्हान असणार आहे.


मल्लिकार्जुन खर्गे अध्यक्ष झाल्यामुळे काँग्रेसच्या परिस्थितीत बदल होणार का?


दरम्यान, आता काँग्रेस कार्यकारिणीसाठीही खर्गेंना नव्यानं काम करावं लागणार आहे. वरिष्ठ नेत्यांसोबतच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्ये (AICC) सरचिटणीस आणि सचिवांसह नवीन टीमची निवड करावी लागणार आहे. यातच खर्गे नवीन अध्यक्ष झाल्याने काँग्रेसला चांगले दिवस येणार का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. याच प्रश्नच उत्तर जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूजसाठी सी-व्होटरने सर्वेक्षण केलं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 12 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर निकाल 8 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. पण निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे. अशा परिस्थितीत गुजरात आणि हिमाचल या दोन्ही राज्यांमध्ये साप्ताहिक निवडणूक सर्वेक्षण सी-व्होटरने केले आहे. सर्वेक्षणात हिमाचल प्रदेशातील 1,397 आणि गुजरातमधील 1,216 लोकांची मते जाणून घेण्यात आली. सर्वेक्षणातील एररचे मार्जिन प्लस मायनस 3 ते प्लेस मायनस 5 टक्के असू शकते. मल्लिकार्जुन खर्गे अध्यक्ष झाल्यामुळे काँग्रेसच्या परिस्थितीत बदल होणार? या प्रश्नावर सर्वेक्षणात 42 टक्के लोकांनी काँग्रेसची परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली, 33 टक्के लोकांनी पूर्वीपेक्षा वाईट होईल असं म्हटलं आहे. तर 25 टक्के लोकांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेमुळे कोणताही बदल होणार नसल्याचे मत व्यक्त केले आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


ABP News C-Voter Survey: खर्गे अध्यक्ष झाल्याने काँग्रेसला चांगले दिवस येणार का? सर्वेक्षणात लोकं म्हणाली...