Agriculture Success Story : कोकणात (konkan) सध्या भात शेतीवर जोर आहे. मात्र, कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी शेती केल्यास शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फायदा होऊ शकतो, हे एका शेतकरी पिता-पुत्राने दाखवून दिले आहे. कोकणच्या लाल मातीत पिता पुत्रांनी झेंडूंच्या फुलांची (Marigold flowers) यशस्वी शेती केली आहे. या झेंडूची पिकवलेली शेती आता त्यांचा स्वयंरोजगार बनली आहे. यातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळत आहे. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवत रत्नागिरी तालुक्यातील दहिवली गावातील विजय घाग आणि विशाल घाग या पिता-पुत्रांनी झेंडूची यशस्वी शेती केली आहे.




आपल्या सहा गुंठे जमिनीवर विजय घाग आणि विशाल घाग यांनी अथर्व ऑरेंज या जातीच्या झेंडूची शेती केली आहे. यासाठी त्यांनी एकात्मिक शेती तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. ज्यामध्ये सेंद्रिय आणि रासायनिक खतांचे योग्य मिश्रण केले आहे. संकरित झेंडूची रोपे आणून मल्चिंग ड्रीपचा वापर केला आहे. या शेतीच्या प्रयोगातून घाग कुटुंबीयांना सुमारे 50 हजार रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. या जागेत एक हजार झेंडू रोपांची लागवड त्यांनी केली आहे. ही रोपे सातारा इथून त्यांनी आणली आहेत.




गणपती सणासाठी लागणाऱ्या झेंडू फुलांची स्थानिक शेतकरी म्हणून बाजारात पुरवठा वाढवणे. तसेच सर्व स्थानिक शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा प्रमुख उद्देश या शेतीमागे असल्याची माहिती कृषी महाविद्यालयाचे प्रा. प्रशांत पवार यांनी दिली आहे. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी विजय घाग यांना दहिवली येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुमित कुमार पाटील सेंद्रिय शेती विषयाचे प्राध्यापक प्रशांत पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे.


दरम्यान, असा झेंडूंच्या शेतीचा रत्नागिरी जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग आहे. हा प्रयोग पिता पुत्रांनी यशस्वी करुन दाखवला आहे. या सहा गुठ्यांवर लावलेल्या झेंडूंच्या शेतीमधून शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. त्यामुळं कोकणातील शेतकरी पर्यायी शेतीचा मार्ग निवडून यशस्वी शेती करु शकतात हे घाग पिता पुत्रांनी दाखवून दिले आहे.  


महत्त्वाच्या बातम्या: