Agriculture News : आता सर्वांना पावसाचे वेध लागले आहेत. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे, लवकरच महाराष्ट्रात वरुणराजाचं आगमन होणार आहे. त्यादृष्टीनं शेतकरी तयारीला लागले आहेत. सध्या शेतकऱ्यांची खते, बी बियाणे  खरेदीसाठी लगबग सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामातील पेरणीपुर्वीच्या कामाच्या मशागतीला लागले आहेत. तसेच बियाणांची खरेदी देखील करत आहेत. 


जून महिना आला आणि  मृग नक्षत्र जवळ येताच  शेतकऱ्यांची लगबग वाढते.  वाशीम जिल्ह्यात खते, बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी कृषी केंद्रावर    खरेदीसाठी गर्दी  केल्याच चित्र आहे.  दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी खते, बी बियाणांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे.  तर दुसरीकडे खते, बी बियाणे महागल्यानं शेतीमागे लागणाऱ्या खर्चातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं बळीराजा चांगलाच मेटाकुटीलाआला आहे.  DAP खते बाजारात उपलब्ध नाहीत, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडत आहेत. सध्या शेतकऱ्यांना महाबीजचे बियाणे  मिळणे देखील कठीण झाले आहे.  त्यात शेतीची मशागत आणि शेतमजुराच्या मजुरीतही वाढ झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडला आहे.  


राज्यात सध्या उष्णतेची लाट 


सध्या राज्यात उष्णतेच्या लाटेनं हैराण केलं आहे. उकाड्यानं हैराण झालेला प्रत्येकजण चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहे. अशातच हवामान खात्यानं मान्सूनबाबत काहीसा दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. येत्या 5 दिवसांत राज्यात अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


पुढील 5 दिवसांत राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस बरसणार


राज्यात यंदा मान्सून  लवकर येण्याचा अंदाज हवामान खात्यानं खरंतर वर्तवला होता. मात्र पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती नसल्यानं गेले चार दिवस मान्सून कर्नाटकातल्या कारवारपर्यंत येऊन थांबला आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला सध्या अडथळा निर्माण झाल्यामुळे मान्सून कर्नाटकातच थबकल्याची माहिती हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आली. पण असं असलं तरी पुढील 5 दिवसांत राज्यातल्या अनेक भागात जोरदार मान्सूनपूर्व सरी बरसण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, राज्यात विदर्भ, मराठवाडा उत्तर महाराष्ट्रासह इतरही अनेक भागांत उष्णतेची लाट कायम राहणार आहे.