Aurangabad Crime News: औरंगाबाद जिल्ह्यातील खुनाच्या घटना काही थांबता थांबत नाही. गेल्या महिन्यात एकाच दिवशी तीन खुनाच्या घटना समोर आल्या होत्या. त्यांनतर आता पुन्हा एकदा एकाचवेळी जिल्ह्यात तीन खुनाच्या घटना उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दोन खुनाच्या घटना शहरात तर एक ग्रामीण भागात उघडकीस आली आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या राजधानीची ओळख आता 'क्राईम कॅपिटल' म्हणून होत असून,गृहमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी सर्वसामन्यांकडून होत आहे.
अशा घडल्या घटना...
पहिली घटना बेगमपुरा पोलीस ठाणे हद्दीतील हिमायतबागच्या शेजारी असलेल्या एका शेताजवळ उघडकीस आली आहे. डोंगराच्या पायथ्याला कोणीतरी अज्ञात आरोपीने एका व्यक्तीच्या डोक्यात वार करून हत्या केली आहे. तर पुरावे नष्ट करण्याचे उद्देशाने एका पांढऱ्या रंगाच्या गोणीत मृतदेह बांधून पेटवून दिला आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत मृतदेह उत्तर तपासणीसाठी पाठवला आहे. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी सूचना दिल्या आहेत.
सातारा परिसरात पत्नीची हत्या...
दुसरी घटना सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहुलनगरमध्ये घडली आहे. पतीने चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात खलबत्ता टाकत तिची हत्या केली आहे. मीना मच्छिंद्र पिटेकर ( वय ५० रा.राहुल नगर ) असे मयत महिलेचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. महिलेचा मृतदेह उत्तर तपासणीसाठी घाटी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
ग्रामीण भागातही महिलेची हत्या...
शहरात दोन खुनाच्या घटना समोर आल्या असतानाच औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बिडकीन येथे सुद्धा एका 65 वर्षे महिलेचा डोक्यात लोखंडी खलबत्ता टाकून हत्या करण्यात आली आहे. महिलेने उधार पैसे देण्यासाठी नकार दिल्याने रात्रीच्या सुमारास तिची हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आरोपी हा मयत महिलेच्या मुलाचा वर्गमित्र होता. राजू ईसाक शेख असे आरोपीचे नाव आहे. आधी अपघात वाटणारी घटना पोलिसांच्या तपासानंतर खून असल्याचं स्पष्ट झाले आहे.
Aurangabad Crime News: उधार पैसे न दिल्याने आला राग; म्हणून मित्राच्या आईचा केला घात
गृहमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी...
औरंगाबाद शहरात सतत एकामागून एक हत्येच्या घटना समोर येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरातील तरून नशेच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पोलिसांनी यासाठी विशेष पथक सुद्धा नेमेले आहे. पण वेगवेगळ्या कारणांनी होणाऱ्या हत्या सत्र काही थांबायला तयार नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता गृहमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी सर्वमान्य औरंगाबादकरांकडून केली जात आहे.