Success Story : केंद्र सरकार आणि  प्रत्येक राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना लॉन्च करत आहे. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. शेतकऱ्यांची प्रगती हेच अंतिम उद्दीष्ट या योजनांचे असते. दरम्यान, तेलंगणा सरकारनं देखील गरीबांच्या उन्नतीसाठी दलित बंधू योजना आणली आहे. या योजनेचा नागरिकांना मोठा फायदा होताना दिसत आहे. या योजनेच्या माध्यमातून एक ट्रॅक्टर चालक राईस मिलचा मालक बनला आहे. पाहुयात त्याची यशोगाथा...


तेलंगणातील राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्यातील ट्रॅक्टर चालक एका राईस मिलचा मालक झाला आहे. तेलंगणा राज्य सरकारच्या प्रमुख दलित बंधू योजनेच्या मदतीने, ट्रॅक्टर चालक परशराम आता इतरांवर अवलंबून नाही. तो आता स्वतःच मालक बनला आहे. तेलंगणातील फाजुलनगर येथील रहिवासी असलेल्या परशराम यांनी दलित बंधू योजनेच्या मदतीने राईस मिल खरेदी केली आहे. दलित बंधू योजनेंतर्गत पहिले मोबाईल राईस मिल युनिट नुकतेच राज्याचे विज्ञान तंत्रज्ञान मंत्री केटी रामाराव यांच्या हस्ते त्यांना सुपूर्द करण्यात आले. इयत्ता सातवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर परशरामने शाळा सोडली. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रोजंदारी मजूर म्हणून काम करायला त्यांनी सुरुवात केली. कारण परशराम लहान असतानाच त्याच्या वडीलांचे निधन झाले होते. दरम्यान, तो ट्रॅक्टर चालवायला शिकला. 2012 पासून ट्रॅक्टर चालक म्हणून काम करू लागला.


भात कापण्याचे यंत्र देखील चालवायचे


ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून काम करण्याबरोबरच त्यांनी भात कापण्याच्या यंत्रावरही काम केले आहे. त्या अनुभवाने त्यांनी गावचे सरपंच नागुला वेणुगोपाल आणि माजी एमपीटीसी गड्डाम हनुमांडुलु यांच्या मदतीने मोबाईल राईस मिल युनिटसाठी अर्ज केला. त्याचवेळी दलित बंधू अंतर्गत मंजूर झालेल्या 10 लाख रुपयांच्या युनिट खर्चासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळं त्यांनी अतिरिक्त मदतीसाठी जिल्हाधिकारी अनुराग जयंती यांच्याशी संपर्क साधला. परशरामच्या विनंतीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना युनियन बँक ऑफ इंडियामधीन दोन लाख 50 हजार रुपयांचे कर्ज मिळवून देण्यासाठी मदत केली. उर्वरित 1.50 लाख रुपये उभे करून परशरामने युनिट खरेदी केले.


दररोज 1300 रुपयांचा फायदा होणार 


एक क्विंटल तांदूळ मिलिंगसाठी 300 रुपये आकारले जात आहेत. यातून ते दररोज 1 हजार 800 रुपये कमवू शकतात. त्यांनी एका दिवसासाठी डिझेलसाठी 500 रुपये सोडले आहेत. त्यांना 1 हजार 300 रुपये नफा मिळेल. याशिवाय ऑफ सिझनमध्ये ट्रॅक्टरच्या साहाय्याने बिगर शेतीची कामेही करता येणार असल्याची माहिती परशराम यांनी सांगितली. ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत असताना परशराम दरमहा सुमारे 10,000 रुपये कमावत होते. त्यामुळं त्यांना कुटुंब चालवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यांची पत्नी स्वरूपा या विडी बनवण्याबरोबरच कुटुंबाला हातभार लावण्यासाठी शेतमजूर म्हणूनही काम करतात. मोबाईल राईस मिल युनिटचा मालक झाल्यामुळं आता आनंदी असल्याचे त्यांनी सांगितले.


दलित बंधू योजना काय आहे?


दलित बंधू योजना ही तेलंगणा सरकारची प्रमुख योजना आहे. या योजनेंतर्गत राज्यातील दलित कुटुंबांना सरकार 10 लाख रुपये देते. यासाठी कोणतीही हमी आवश्यक नाही. हे कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही त्यामुळे त्याची परतफेड करण्याची गरज नाही. दलित कुटुंबांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे. ही योजना तेलंगणा सरकारने 2021 मध्ये सुरू केली. 


महत्त्वाच्या बातम्या:


भाग्यवान गाय!  एका गायीनं पालटलं कर्जबाजारी कुटुंबाचं नशीब, कसा घडला चमत्कार?