अकोला : राज्यात रावण दहनाच्या (Ravan Dahan) प्रथेवर बंदी आणण्याची मागणी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते (NCP Ajit Pawar Faction) आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) सरकारकडे केली आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात सभागृहात आवाज उठवणार असल्याचं आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले. आमदार मिटकरींच्या मागणीनंतर या विषयावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहेत. सध्या राज्यात आदिवासी संघटनांचा रावण दहनाला विरोध आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार, प्रवक्ते अमोल मिटकरींनी आज अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावाला भेट दिली. या गावात रावण मंदिराच्या उभारणीसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.  त्यांनी आपल्या आमदार निधीतून सांगोळ्यातील सभागृह बांधकामासाठी दिलेल्या 20 लाखांच्या निधीच्या कामाचं भूमिपूजन केलंय. सांगोळा गावात 350 वर्ष जुनी रावणाची मूर्ती आहे. या संपूर्ण गाव दसऱ्याच्या दिवशी रावणाची पूजा करण्यात येते. 


भूमिपूजनानंतर अमोल मिटकरी यांनी म्हटले की, रावण हे आदिवासींचे दैवत असेल तर रावण दहन कशाला, आदिवासी बांधवांची भावना रावणासोबत असेल तर रावण दहनाला बंदी घातली पाहिजे. लंकेचा राजा आणि शिवभक्त असलेल्या रावणाच्या पुतळ्याचे दहन कशाला? आम्ही रामाची पूजा करतो, पण रावणाचे दहन कशाला असा सवाल त्यांनी केला. रावण दहनावर बंदी घालण्यासाठी आपण विधीमंडळात आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.  


भंडारा जिल्ह्यात रावण दहनाला मनाई


भारतातील काही आदिवासी समुदायांमध्ये रावणाची पूजा केली जाते. भंडारा जिल्ह्यातील काही आदिवासी संघटनांनी रावण दहनावर बंदी घालण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर भंडारा जिल्ह्यात रावण दहनास मनाई करण्यात आली आहे. 


अन्याय, अहंकारी, पापी वृत्तीचे प्रतिक म्हणून रावणाचे दहन करण्यात येते. विजयादशमीच्या (Vijayadashmi) दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला असल्याची आख्यायिका आहे. त्यानुसार देशभरात हिंदू धर्मीय रावण दहनाचे कार्यक्रम आयोजित करतात. मात्र, मागील काही वर्षांपासून आदिवासी संघटनांकडून याला विरोध केला जात आहे. भंडारा जिल्ह्यात यावर्षी आदिवासी समाज बांधवांनी या रावण दहनला प्रचंड विरोध केला आहे. रावण दहन केल्यास अनुसूचित जमाती समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे. अखिल भारतीय आदिवासी परिषद,  ऑल इंडिया आदिवासी पीपल्स फेडरेशनच्या वतीनं तसं पत्र भंडारा जिल्हा प्रशासनाला दिलं आहे. 


या पत्राच्या अनुषंगाने भंडाऱ्याच्या अतिरिक्त जिल्हा न्याय दंडाधिकारी लीना फालके यांनी एक आदेश बजावला आहे. या आदेशानुसार आदिवासी महात्मा राजा रावण यांच्या पुतळ्याचे दसऱ्याच्या दिवशी दहन करणाऱ्या व्यक्ती किंवा मंडळावर गुन्हे दाखल करावे, असं या आदेशात नमूद आहे. सध्या हे पत्र समाज माध्यमावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, याबाबत फालके यांचे दोन पत्र व्हायरल होत आहे. दुसऱ्या पत्रात कोणताही आदेश नमूद नाही.