Cotton News : सध्या देशात महागाईचा भडका उडाला आहे. दिवसेंदिवस इंधनांच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळं सामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. अशातच कापड उद्योगातून एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे कपड्यांच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकारने कापसाच्या आयातीवरील कस्टम ड्युटी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं कपड्यांच्या किमंती होणार आहेत. महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारने कापसाच्या आयातीवरील सर्व सीमाशुल्क हटवण्याचा निर्णय घेतला आहे. ही सूट 30 सप्टेंबर 2022 पर्यंत राहणार आहे.


सततच्या महागाईनं होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कापसाची किंमत कमी करण्यासाठी सरकारने कापसाच्या आयातीवरील सर्व सीमाशुल्क हटवण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण कापड साखळीला या सवलतीचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच आता सूत, कापड, फॅब्रिक आणि कापसापासून बनवलेल्या इतर सर्व वस्तूंच्या किंमतीत घट होणार आहे. त्यामुळं वस्त्रोद्योग आणि ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कपड्यांच्या किंमतीत कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळू शकतो.


दरम्यान, वस्त्रोद्योगातून 5 टक्के मूळ कस्टम ड्युटी हटवण्याची मागणी होत होती. याशिवाय कच्च्या कापसावरील 5 टक्के कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (CBIC) कापसाच्या आयातीवरील कस्टम ड्युटी आणि कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर काढून टाकण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. CBIC च्या अधिसूचनेनुसार, 14 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंत, म्हणजेच साडेपाच महिन्यांसाठी, कापूस आयातीवर ही सूट कायम राहणार आहे. त्यामुळे या काळात कपड्यांच्या किंमती कमी होणार आहेत.


कापसावरील सीमाशुल्क हटवण्याच्या निर्णयामुळे कापडाच्या मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्यातीला चालना मिळेल. या हालचालीमुळे सूत आणि कापडाच्या किंमती कमी होतील आणि तयार कपड्यांसह इतर उत्पादनांची निर्यात वाढेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


महत्त्वाच्या बातम्या: