Coarse Grain Export : अन्नधान्याच्या उत्पादनात (Food Production) इतर देशांच्या तुलनेत भारत आघाडीवर आहे. सध्या देशात गहू, मका, तांदळासह कडधान्यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळं भारताला (India) परदेशात मोठ्या प्रमाणावर धान्याची निर्यात (Coarse Grain Export) करण्याची संधी आहे. केंद्र सरकारच्या योजनेनुसार भारत जगातील अनेक मोठ्या देशांमध्ये भरड धान्याची निर्यात करणार आहे. भरड धान्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. भारतातून जगातील 11 देशांना भरड धान्याची निर्यात केली जाणार आहे. पुढील एक वर्षासाठी जगातील विविध भागात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात देशातील निर्यातदार आणि शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे.
भरडधान्याचे देशात मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्याने भारत पूर्वेकडील देशांपासून पश्चिमेकडील देशांपर्यंत निर्यात करणार आहे. दक्षिण आफ्रिका, दुबई, जपान, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, सौदी अरेबिया, सिडनी, बेल्जियम, जर्मनी, ब्रिटन आणि अमेरिका येथे भरड धान्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम तयार करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांतर्गत परदेशात भरड धान्य प्रदर्शित केले जाईल. परदेशात भारतीय दूतावास स्थापन करण्यात आले आहेत. भरड धान्य विकण्याचे कामही दूतावास करणार आहेत. भरड धान्यांमध्ये बाजरी, नाचणी, ज्वारी आणि गहू यांचा समावेश आहे.
2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष
संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे वर्ष भरड तृणधान्यांचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून आधीच घोषित केले आहे. जगातील 72 देशांनीही याला पाठिंबा दिला आहे. यावरुनच भरडधान्यांचे महत्त्व समजू शकते. गेल्या वर्षी झालेल्या निर्यातीबद्दल बोलायचे झाले तर भारतानं यूएई, नेपाळ, लिबिया, ओमान, इजिप्त, ट्युनिशिया, येमेन, ब्रिटन, अमेरिका या देशांना मोठ्या प्रमाणात भरड धान्य निर्यात केले आहे.
कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादनांच्या निर्यातीत 25 टक्क्यांची वाढ
भारताच्या कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादनांच्या निर्यातीत (Agriculture Export) 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या (2022-23) दुसऱ्या तिमाहीत 13 हजार 771 डॉलरवर ही निर्यात पोहोचली आहे. फळे, भाज्या आणि तृणधान्ये आणि प्रक्रियाकृत खाद्यान्नाच्या निर्यातीत या आर्थिक वर्षात मोठी वाढ झाली आहे. प्रक्रियाकृत फळे आणि भाज्यांच्या निर्यातीत चालू आर्थिक वर्षाच्या सहा महिन्यात, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 42 टक्क्यांची वाढ झाली आहे.
गेल्या सहा महिन्यात (एप्रिल ते सप्टेंबर) कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादनांच्या 2021-22 या आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. वाणिज्य माहिती आणि सांख्यिकी महासंचालनालयाने (डीजीसीआय अँड एस) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार ही माहिती देण्यात आली आहे. कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न निर्यात विकास प्राधिकरणाच्या (अपेडा) एकंदर निर्यातीमध्ये वाढ होऊन ती एप्रिल ते सप्टेंबर 2022 या काळात 13 हजार 771 दशलक्ष डॉलरवर पोहोचली. गेल्या वर्षी याच काळात ही निर्यात 11 हजार 56 दशलक्ष डॉलरवर होती.
महत्त्वाच्या बातम्या: