Nashik News : एकीकडे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आमच्यात सर्व आलबेल असून नाशिक (Nashik) जिल्ह्यात आम्ही एका दिलाने काम करत असल्याचे स्पष्टीकरण देत आहेत. मात्र दुसरीकडे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) मात्र भुसेंवर नाराज असल्याचे समोर आले आहे. महत्वाच्या बैठकांना का बोलावलं जात नाही, असा सवालच सुहास कांदे यांनी दादा भुसेंना विचारल्याने नाशिकमध्ये शिंदे गटात आलबेल नसल्याचे चिन्ह दिसू लागली आहे. 


शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर पहिल्यांदा नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) याना पाठींबा दर्शविला. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये कृषिमंत्री राहिलेले दादा भुसे यांनी देखील शिंदे गटाची वाट धरली. त्यामुळे एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा नाशिक जिल्ह्यात मात्र परिस्थिती बदलली आहे. कारण नांदगावचे आमदार सुहास कांदे हे नाराज असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये शिंदे गटाचे टेन्शन वाढवलं आहे. 


दरम्यान गेल्या दीड दोन महिन्यांपासून आमदार सुहास कांदे हे कोणत्याही कार्यक्रम, अथवा बैठकांना दिसत नसल्याची बाब माध्यम प्रतिनिधीनीं दादा भुसेंच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी दादा भुसेंनी स्पष्टीकरण देताना म्हणजे कि, याबाबत कोणताही चुकीचा अर्थ न लावण्याची विनंती करतानाच आम्ही एक दिलाने काम करीत असल्याची ग्वाही दिली. पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत भुसे यांनी कांदे यांच्या प्रश्नावर अधिक स्पष्टपणे भूमिका मांडत कोणताही गैरसमज करू नये असे सांगितले. दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये येऊन गेले. त्यावेळी कांदे या ठिकाणी उपस्थित नव्हते. याशिवाय शिंदे गटाच्या कार्यक्रमांना देखील कांदे फारसे दिसत नसल्याचे भुसेंना सांगितले. 


गेल्या काही दिवसांपासून या चर्चा सुरु असताना सुहास कांदे यांनी यावर पडदा टाकला असून विशेषतः याबाबत भुसेंनाच जाब विचारण्याचा सल्ला दिला आहे. कांदे म्हणाले कि, महत्त्वाच्या बैठकांना का बोलावलं जात नाही, हे भुसेंना विचारावे. मात्र शिंदे गटासोबत आपण मरेपर्यंत असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आपण नाराज नसून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर आपला विश्वास असल्याचं सुहास कांदे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे भुसे -कांदे नाराजीनाट्य शिंदे गटाला भारी पडणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शिवाय शिंदे गटातले हे नाराजीनाट्य मात्र बाळासाहेंबाच्या शिवसनेच्या पथ्यावर पडणार असल्याचे दिसते.