मुंबई : आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी.. पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..
राज ठाकरेंच्या हिंदू कार्डनंतर, देवेंद्र फडणवीसांचा ‘जागो हिंदुचा नारा
लंका का दहन होगा, सब वानरसेना मेरी साथ तयार आहे. बीएमसीवर भाजपचा झेंडा फडकणार तुम्ही तयार व्हा, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये पार पडलेल्या उत्तरसभेत ते असे म्हणाले आहेत. बीकेसी येथील सभेत बाबरी मशिदीवरील उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, ''अयोध्याच्या आंदोलनात तुमचा (उद्धव ठाकरे यांना उद्देशून) एकही नेता नव्हता, हे म्हंटल्यावर राग आला.'' अभिनेता गोविंदा याच्या चित्रपटातील गाण्याच्या अंदाजात उद्धव ठाकरे यांना टोमणा लगावत ते म्हणाले, ''मैं तो अयोध्या जा रहा था, मैं तो मस्जिद गिरा रहा था, तुझ को मिर्ची लगी तो में क्या करू.'' ते म्हणाले, ''हो मी गेलो होतो बाबरी पाडायला, याचा मला अभिमान आहे. 1992 साली मी नगरसेवक झालो. जुलैमध्ये मी वकील झालो आणि डिसेंबरमध्ये मी अयोध्येला मशीद पाडायला गेलो होतो. तुम्ही गेले होते, सहलीला. आम्ही नाही.'' यावेळी त्यांनी जागो हिंदुचा नारा दिला आहे.
उद्धव ठाकरेंचा पुढचा प्लॅन काय?
बीकेसीतल्या सभेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेणार आहेत. या सभा सर्व विभागवार घेणार असल्याची माहिती आहे. या सभा कुठे आणि कुठल्या मुद्द्यांवर होणार. या सभांचा फायदा सेनेला किती होणार? हे पाहावं लागेल.
आज नारायण राणे यांची पत्रकार परिषद
नारायण राणे उद्धव ठाकरेंवर काय बोलणार? केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.
प्लेऑफचं आव्हान टिकवण्यासाठी एकमेकांशी भिडणार पंजाब - दिल्लीचा संघ
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 64 व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स एकमेकांशी भिडणार आहे. नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. प्लऑफच्या शर्यतीतील आव्हान कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. यंदाच्या हंगामात पंजाबच्या संघानं 12 सामने खेळले आहेत. त्यापैकी सहा सामन्यात विजय मिळवला आहे. तर, सहा सामन्यात पराभव स्वीकारला आहे. दुसरीकडं दिल्लीच्या संघानंही 12 सामने खेळून सहा सामने जिंकले आहेत. तर, सहा सामन्यात पराभव पत्कारला आहे.