इंदापूर : आपण आजपर्यंत जांभळ्या रंगाचे जांभळाचे पीक पाहिले असेल. परंतु इंदापूर तालुक्यातील भारत लाळगे या शेतकऱ्याने पांढऱ्या रंगाचे जांभूळ पिकवले आहे. भारत लाळगे यांनी एक एकरावर पांढऱ्या रंगाच्या जांभळाची लागवड केली. पांढऱ्या रंगाच्या जांभूळ पिकाची लागवड करणारे भारत लाळगे हे राज्यातील पहिले शेतकरी असल्याचा त्यांचा दावा आहे. लाळगे यांच्या जांभूळ पिकाला सध्या 400 रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळत आहे.


झाडाला लटकलेलं घड बघून एखाद्याला अॅपल बोर लटकत असतील अस वाटेल. पण ही पांढऱ्या रंगाची जांभळं आहेत असं सांगितल्यावर कोणाचा चटकन विश्वास बसणार नाही. आजपर्यंत आपल्याला जांभळाचा रंग हा जांभळा हेच माहित होतं, शिवाय पाहिलं होतं. परंतु इंदापूर तालुक्यातील भारत लाळगे या शेतकऱ्याने पांढऱ्या रंगाच्या जांभळाचं पीक घेतले आहे. एकूण 23 एकरापैकी 1 एकर जमिनीवर पांढऱ्या रंगाच्या जांभळाची लागवड भारत लाळगे यांनी केली. एकरी 302 रोपांची लागवड लाळगे यांनी केली आहे. राज्यातील पांढऱ्या जांभूळाचे पीक घेणारे आपण पहिलेच शेतकरी असल्याचं भारत लाळगे सांगतात.


भारत लालगे यांची इंदापूर तालुक्यामध्ये दोन ठिकाणी शेती आहे. एक सरडेवाडी आणि दुसरी सराफवाडीत अशी एकूण 23 एकर शेती आहे. याआधी भारत लाळगे डाळिंब आणि पेरु या पिकाची लागवड करत होते. परंतु लाळगे यांना सलग डाळिंब या पिकात चार वर्ष तोटा सहन करावा लागला. म्हणून 2019 साली पेरुच्या पिकात त्यांनी पांढऱ्या रंगाच्या जांभळाची आंतरपीक म्हणून लागवड केली. कमी पाण्यात आणि कमी खर्चात जांभळाचे पीक घेतलं जातं. सध्या जांभळाची हार्वेस्टिंग सुरु आहे. ज्याची मार्केटला किंमत 300 रुपयांपासून 400 रुपये प्रतिकिलो इतकी आहे. 


या जांभूळ पिकामध्ये अ आणि क जीवनसत्त्व असल्याचं तज्ज्ञ सांगतात. तसंच पांढऱ्या रंगाच्या जांभळात विविध औषधी गुण असल्याचे तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 


पूर्वी माळरानावर रानामेव्याची झाडं असायची. परंतु कालांतराने शहरीकरण वाढत गेलं त्यामुळे रानमेवा कमी होऊ लागला. त्यामुळे आता हाच औषधी रानमेवा मिळवण्यासाठी त्याची शेती करावी लागत आहे. भारत लाळगे यांनी एक एकरावर जांभूळ या पिकाची लागवड केली आहे. त्यातून त्यांना सध्या चांगलं उत्पन्न मिळत आहे. या पुढचा काळ हा बाजारात खपेल तेच पिकवणाऱ्याचा आहे. त्याचा विचार करता भारत लाळगे यांची शेती ही आगामी काळासाठी वरदान ठरणार आहे