Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यावर शोककळा पसरली असून निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) जवानास वीरमरण प्राप्त झाल्याची माहिती मिळते आहे. तालुक्यातील महाजनपूर येथील जवान राजस्थानमधील (Rajasthan) बाडमेर येथे कर्तव्यावर असताना त्यांना वीरमरण आले. रंगनाथ वामन पवार असे मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूचे अद्याप कारण समजू शकले नाही. देशाचे संरक्षण करत असलेल्या जवानाचे निधन झाल्याने निफाड तालुक्यावर शोककळा पसरली आहे...


महाजनपूर येथील रंगनाथ वामन पवार यांचे 12 वी पर्यंत शिक्षण झाले. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने ते गुरे चारण्यासाठी जात असत. त्यातच 1998 मध्ये मित्रांनी त्यास मध्यप्रदेशातील भोपाळ येथे सैन्य दलात भरती होण्यासाठी नेले. तेथेच त्यांची निवड झाली. पुढे प्रशिक्षणासाठी त्यांना सहा महिन्यासाठी झारखंड मधील हजारीबाग येथे पाठविण्यात आले. त्यानंतर बीएसएफ (सीमा सुरक्षा बल) मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली. सध्या ते राजस्थान मधील बाडमेर येथे सेवेत होते. आज सकाळी त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली.


रंगनाथ यांच्या पश्चात वडील, आई, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. बंधू विलास हा उत्पादन शुल्क अधिकारी म्हणून मुंबई येथे कार्यरत आहे. जवान रंगनाथ यांची सेवा थोडेच दिवस शिल्लक असल्याने त्यांनी नाशिक येथे जागा घेऊन बंगल्याचे काम सुरू केले होते. आता हे काम पूर्ण झाले आहे. थोड्याच दिवसात ते नाशिक येथे स्थायिक होणार होते. मात्र, त्यापूर्वीच नियतीने घाला घातल्याने दु:ख व्यक्त केले जात आहे. दरम्यान मयत रंगनाथ याचे पार्थिव मुंबईला आणण्यात आले असून ते घेण्यासाठी बंधू विलास सकाळीच मुंबईकडे रवाना झाला आहेत. सायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पी. वाय. काद्री यांनी महाजनपुर येथे भेट दिल्याची माहिती देण्यात आली आहे.


छगन भुजबळांकडून शोक व्यक्त 
निफाड तालुक्यातील महाजनपूर येथील सुपुत्र वीर जवान रंगनाथ पवार यांना राजस्थान येथे भारतीय सैन्यदलात कर्तव्य बजावत असतांना वीर मरण आले. अतिशय दु:ख झाले. महाजनपूर सारख्या छोट्याश्या खेड्यातून पुढे येत जवान रंगनाथ पवार यांनी अतिशय हलाकीच्या परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अतिशय कठोर परिश्रम घेऊन ते भारतीय सैन्यदलात दाखल झाले होते. त्यांच्या निधनाने भारत मातेने एक वीर सुपुत्र गमावला आहे. मी व माझे कुटुंबीय शहीद जवान रंगनाथ पवार यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.


निफाड तालुक्याला दुसरा धक्का 
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याला हा दुसरा धक्का असून दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील नांदुर्डी येथील जवानास वीरमरण आले. किशोर गंगाराम शिंदे असे या जवानाचे नाव होते. हा जवान अमृतसर येथे बीएसएफ र्थात सीमा सुरक्षा दलात कार्यरत असताना मंगळवारी अपघाती वीर मरण आले. या घटनेने नादुंर्डी गावावर शोककळा पसरली. त्यानंतर आज दोनच दिवसानंतर निफाड तालुक्यातीलच जवानास वीरमरण आल्याने नाशिक जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.