पुणे : बारामती तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची महाबीजने सोयाबीन बियाण्यात फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी महाबीजकडून बियाणे घेतले, परंतु त्याला फुले किंवा शेंगा आल्या नसल्याची तक्रार शेतकऱ्यांची आहे. ज्यांनी खाजगी कंपनीचे बियाणे घेतले त्यांच्या पिकाला मात्र फटका बसला नाही. परंतु बारामती तालुक्यातील अनेक गावातील लोकांची महाबीजने फसवणूक केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
बारामती तालुक्यातील खांडज गावचे रवींद्र आटोळे हे 31 वर्षीय उच्च शिक्षित तरुण. त्यांनी आपल्या शेतातील सात एकरावर महाबीजचे बियाणे वापरून सोयाबीन लागवड केली. परंतु महाबीजने बियाणं देताना फसवणूक केल्याच्या आरोप रवींद्र आटोळे करत आहे. त्यांच्या सोयाबीनच्या पिकावर शेंगा न लागणे, फुले न लागणे तसेच रोगाचा प्रादुर्भाव जास्त आहे. रवींद्र यांनी आतापर्यंत 1.75 रुपये खर्च करून देखील त्यांच्या हातात काही लागणार नाही.
हीच परिस्थिती तेजस पोंदकुले, रोहित राऊत आणि इस्माईल मुलाणी यांची आहे. या सर्वांनी जानेवारी महिन्यात प्रत्येकी तीन एकरावर सोयाबीनची लागण केली. परंतु म्हणावे त्या प्रमाणात त्यांच्या पिकाला फुलं लागली नाहीत. परिणामी सोयाबीनच्या झाडाला शेंगा कमी प्रमाणात लागल्या आहेत. महाबीजने घालून दिलेल्या अटीप्रमाणे त्यांनी पिकांचे नियोजन केले ,परंतु तोंडाचा घास हिरावून घेतल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.
बारामती तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची महबीजने सोयाबीन बियाणामध्ये फसवणूक केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. फसवणूक प्रकरणी अनेक तक्रारी कृषी खात्याला प्राप्त झाल्या असल्याचे कृषी अधिकारी यांचं म्हणणं आहे. कृषी खातं आणि महाबीजचे अधिकारी तक्रारदार शेतकऱ्यांच्या प्लॉटची पाहणी करणार असल्याचे कृषी खात्याचे म्हणणं आहे.
महाबीज अधिकारी आणि कृषी खात्यामार्फत जरी तक्रारी केलेल्या शेतकऱ्यांच्या प्लॉटची पाहणी सुरू असली तरी शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण असा सवाल शेतकरी करीत आहेत. सोबतच महाबीजने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
शेतकऱ्यांना रास्त दारात आणि खात्रीशीर बियाणे देत असल्याचा दावा महाबीज करते. परंतु महाबीजच्या बियाण्यावर शेतकऱ्यांनी फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. तसेच फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. त्यामुळे महाबीजवर शेतकऱ्यांनी केलेला आरोप मान्य करणार आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार का हा खरा प्रश्न आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Milk FRP: दूध एफआरपीच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक; देशभरात संघर्ष उभारणार
- Sangli turmeric news : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची आवक वाढली, वर्षभरात 1 हजार 899 कोटींची उलाढाल
- Buldhana Farmers News : डाळ आयातीला केंद्र सरकारची मुदतवाढ; बुलढाण्यात शेतकऱ्यांचे आंदोलन, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी