Union Budget 2022 : यंदाचा अर्थसंकल्प नुकताच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला. यानंतर विविध क्षेत्रातून या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान भारतीयांसाठी सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे शेतीला या अर्थसंकल्पात काय मिळालं याबाबत सर्वत्र चर्चा सुरु असून अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी मात्र' या अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांची निराशाच केली', अशी प्रतिक्रिया दिली आहे. या अर्थसंकल्पात तेलबिया निर्मितीला प्राधान्य देण्याची, सिंचन क्षेत्रामध्ये वाढ करण्याची, नदीजोड प्रकल्प गांभीर्याने राबवण्याची आणि सौर ऊर्जेला प्राधान्य देण्याची सकारात्मक घोषणा केली आहे. पण दुसरीकडे बजेटमध्ये शेतकऱ्यांना आधारभावाचे संरक्षण देण्यासाठी अपेक्षित तरतूद न झाल्याने अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांना निराश केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


नवले म्हणाले, 'केंद्र सरकारच्या धोरणांचा परिणाम म्हणून देशात कृषी संकट दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकऱ्यांना या शेती संकटांमध्ये दिलासा देण्यासाठी आधारभावाच्या संरक्षणाची आवश्यकता आहे. दिल्ली येथे वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनानेही हीच आवश्यकता वारंवार व्यक्त केलेली आहे. अशा पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये याबाबत ठोस तरतूद होईल अशी अपेक्षा शेतकरी बाळगून होते. प्रत्यक्षात मात्र केवळ 1208 लाख टन गहू आणि तांदूळ खरेदीचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे. शेतकऱ्यांना परस्पर बाजारात आधारभावाचे संरक्षण मिळेल यासाठीही कोणतीही नवीन योजना केंद्र सरकारने जाहीर केलेली नाही. टोमॅटो, कांदा, भाज्या व फळभाज्या या नाशवंत पिकाच्या भाव संरक्षणासाठीही पुरेशी आर्थिक तरतूद  करण्यात आलेली नाही.' 


'केंद्राच्या धोरणामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढला'


पुढे बोलताना नवले म्हणाले, 'केंद्र सरकारच्या धोरणांचा परिणाम म्हणून शेतीचा उत्पादन खर्च सातत्याने वाढतो आहे. पेट्रोल, डिझेल, वीज आणि इंधनाचे दर वाढल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. इंधनावरील दर कमी करून शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्याची अपेक्षा शेतकरी बाळगून होते, मात्र असे करण्या ऐवजी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी पुन्हा एकदा अत्यंत अशास्त्रीय आणि कपोलकल्पित संकल्पनेवर आधारित असलेल्या  झिरो बजेट शेतीचा पुनरुच्चार केलेला आहे. किसान सभेच्या वतीने केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या झिरो बजेट शेतीच्या अशा अशास्त्रीय आणि कपोलकल्पित दुराग्रहाचा आम्ही निषेध करत आहोत.' 



संबंधित बातम्या: