Pune: मुलीला पळवून नेत जबरदस्ती लग्न केल्याप्रकरणी पुण्याच्या बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 30 जानेवारीला पीडित मुलगी बारामती मधून पुण्याला चालली होती. परंतु, पुण्यात पोहचली नाही म्हणून तिच्या नातेवाईकांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी मुलीचा शोध घेऊन तिला पोलीस ठाण्यात आणले असता एक धक्कादायक माहिती समोर आलीय. 


बारामतीमधील मुलीची ऋषिकेश जगताप या मुलाशी ओळख होती. ऋषिकेश देखील बारामतीतील रहिवासी आहे. ऋषिकेशने मुलीला लग्नाची मागणी घातली होती. परंतु, मुलीची ऋषिकेशसोबत लग्न करण्याची मानसिकता नव्हती. दरम्यान, मुलीला तिच्या नातेवाईकांनी पुण्याला जाण्यासाठी एसटीमध्ये बसवले, याची माहिती ऋषिकेशला मिळाली. त्यानं वाटेत एसटी थांबवून तिला खाली उतरण्यास सांगितले. परंतु, मुलगी उतरली नाही. ऋषिकेश एसटीचा पाठलाग करीत होता. थोड्या वेळानं पुन्हा ऋषिकेश मुलीला फोन केला. तसेच तू खाली उतरली नाही तर तुझ्या भावाला जीवे मारेल आणि मी देखील आत्महत्या करेल अशी धमकी दिली. त्यांनंतर पीडित मुलगी बस मधून खाली उतरली. 


ऋषिकेश मुलीला घेऊन आळंदी येथे गेला आणि तिच्याशी जबरदस्ती लग्न केलं. या विवाहाला साक्षीदार म्हणून शुभम कराळे आणि किरण खोमणे उपस्थित होते. त्याच्या नावाचा देखील गुन्ह्यात समावेश असल्याकारणाने त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ऋषिकेश जगताप आणि शुभम कराळेला पोलिसांनी अटक केली आहे.  किरण खोमणे सध्या फरार आहे.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha