Ajit Nawale : पावसाचे कारण देत राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरात वेगवेगळ्या कारणानं अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका सातत्यानं पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यावरुन अखिल भारतीय किसान सभा (All India Kisan Sabha) आक्रमक झाली आहे. पराभव समोर दिसत असल्यानेच राज्य सरकारनं सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या असल्याची टीका किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले (Ajit Nawale) यांनी केली. अचानक निवडणुका पुढे ढकलल्या जाणं ही लोकशाही विरोधी कृती आहे. हा सत्तेचाही दुरुपयोग असल्याचे नवले म्हणाले. 


निवडणुका पुढे ढकलणं लोकशाही विरोधी


दरम्यान, आता सुरु असलेल्या निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. अनेक संस्थांच्या निवडणुकांमध्ये केवळ मतदानाची प्रक्रिया बाकी आहे. अशा परिस्थितीमध्ये अचानक निवडणुका पुढे ढकलल्या जाणं लोकशाहीविरोधी आहे. हा सत्तेचाही दुरुपयोग असल्याचे नवले म्हणाले. राज्यभरातील अनेक सहकारी संस्थांमध्ये भाजपला आपला पराभव दिसत असल्यामुळेच शिंदे-भाजपा सरकारनं हा लोकशाही विरोधी निर्णय घेतलेला आहे. किसान सभेच्या वतीने राज्य सरकारच्या या निर्णयाचा धिक्कार करत असल्याचे अजित नवले म्हणाले. राज्य सरकारने तातडीने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. तसेच  सहकारी संस्थेत लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन किसान सभेच्या वतीने राज्य सरकारला करत असल्याचे नवले यावेळी म्हणाले. 


राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतींच्या निवडणुकांना नुकतीच स्थगिती दिली आहे. त्यानंतर आता राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. पूर आणि आपात्कालीन परिस्थितीमुळे सहकार विभागाने हा निर्णय घेतला आहे. सहकार विभागाच्या या निर्णयामुळे सुमारे 8 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. याच मुद्द्यावरुन किसान सभा आक्रमक झाली आहे. सरकारचे हे कृत्य लोकशाही विरोधी असल्याचे अजित नवले यांनी म्हटले आहे.  


महत्त्वाच्या बातम्या: