पुणतांबा शेतकरी आंदोलनाचा तिसरा दिवस; आंदोलन सुरु असतानाच नाशिकमध्ये कांदा परिषदेची घोषणा
Puntamba Farmer Protest : पुणतांबा धरणे आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. आज शेतकरी आंदोलक मोफत दूध वाटपासह शिल्लक उसाची होळी करत शेतकरी सरकारचा निषेध करणार आहेत.
Puntamba Farmer Protest : पुणतांबा धरणे आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. आज शेतकरी आंदोलक मोफत दूध वाटपासह शिल्लक उसाची होळी करत शेतकरी सरकारचा निषेध करणार आहेत. याशिवाय पथनाट्यातून कृषीकन्या शेतकऱ्यांची व्यथा मांडणार आहेत. आज या ठिकाणी कृषीमंत्री दादा भुसे येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. दरम्यान पुणतांबा गावातील आंदोलक शेतकऱ्यांना पहिल्याचं दिवशी 149 अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे. कोरोनाचं समूळ उच्चाटन न झाल्याचं कारण देत ही नोटीस बजावली. राज्यात सगळीकडे सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय मेळावे मोर्चा सभा सुसाट सुरू असताना ही नोटीस दिल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
आंदोलन सुरू असतानाच नाशिकमध्ये कांदा परिषदेची घोषणा
पुणतांबामधील शेतकरी आंदोलन सुरू असतानाच नाशिकमध्ये कांदा परिषदेची घोषणा करण्यात आली आहे. 5 जूनला ही कांदा परिषद होणार आहे. निफाड तालुक्यातील रुई या गावात सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या वतीने कांदा परिषद घेण्यात येणार आहे. या परिषदेला विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार आहेत. कांद्याच्या दरात काही दिवसांपासून घसरण सुरू आहे,त्यावर आवाज उठविण्यासाठी कांदा परिषद होणार आहे. कांद्याला अनुदान मिळावे, नाफेडच्या कांदा खरेदी मध्ये सुसूत्रता यावी, हमीभाव मिळावा आशा वेगवेगळ्या मागण्यासाठी कांदा परिषद घेतली जाणार आहे. शेतकरी नेते शरद जोशी यांनी 1982 साली निफाड तालुक्यातील रुई या गावात कांदा परिषद घेतली होती. पुन्हा त्याच रुई गावात पुन्हा रयत क्रांती संघटनेच्या वतीने कांदा परिषद घेतली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान काल, काँग्रेस नेते नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात पुणतांब्यातील आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीला गेले होते. तर, काँग्रेसच्या चिंतन शिबिरात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली होती. शेतीवर आधारीत उद्योग आणि शेतकऱ्यांना वीज देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं होतं.
पाच वर्षांपूर्वी याच पुणतांबा गावातून शेतकऱ्यांचं आंदोलन पेटलं होतं. त्यावेळी शासनात असलेल्या राज्यकर्त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाहीत म्हणून पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन करत आहेत.
कोणत्या मागण्यांसाठी आंदोलन:
1) ऊसाला एकरी एक हजार रूपये अनुदान द्यावे
2) शिल्लक ऊसाला हेक्टरी दोन लाख रूपये द्यावे
3) कांद्यासह सर्व पिकांना हमीभाव द्यावा
4) कांद्याला प्रती क्विंटल 500 रूपये अनुदान द्यावे
5) शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण आणि सुरळीतपणे वीज मिळावी
6) थकित विजबिल माफ झाले पाहिजे
7) कांदा आणि गव्हाची निर्यात बंदी उठवावी
8)सर्व पिकांना आधारभूत किंमत दिली जावी त्यासाठी आयोगाची स्थापना करून निर्णय घ्यावा
9) 2017 साली केलेल्या कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी
10) नियमित कर्ज भरणारांचे अनुदान दिले जावे
11) दुधाला ऊसाप्रमाणे एआरपी लागू केला जावा
12) दुधाला कमीतकमी चाळीस रूपये दर दिला जावा
13) खाजगी दूध संकलन केंद्रात होणारी लूट थांबवावी
14) वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास भरपाई दिली जावी
15) शेतकरी आंदोलनात दाखल गुन्हे मागे घेतले जावे
16) वन हक्क कायद्यानुसार आदिवासींच्या जमिनी त्यांच्या नावावर केल्या जाव्या