अहमदनगर : अर्धा पावसाळा संपत आला पण राज्यात अनेक भागात जोरदार पाऊस झाला नाही. पावसाने पाठ फिरवल्याचा परिणाम हा जसा शेतीवर झालाय तसाच दुग्धव्यवसायावर देखील झालाय. अनेक भागात चारा टंचाईला सुरुवात झालीये...अहमदनगर तालुक्यातील गुंडेगाव भागात श्रावण महिना सुरू झाला तरी पावसाने दांडी मारल्याने ऊस, मका पिकासह अन्य पिकेही काही प्रमाणात धोक्यात आली आहेत. त्यामुळे दुधाची पंढरी ओळख असणाऱ्या गुंडेगाव भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याचा परिणाम दूध व्यवसायावर होत आहे.


अहमदनगर जिल्ह्यातील गुंडेगाव हे गाव दुग्धव्यवसायासाठी ओळखलं जातं. गुंडेगाव हे नगर तालुक्यातील अतिशय छोटेसे गाव आहे. मात्र या गावात दररोज 12 ते 13 हजार लिटर दुध संकलन होतंय. मात्र मागील दोन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने या गावात चारा टंचाई मोठ्या प्रमाणात सुरु आहे.  त्याचा परिणाम हा दुग्धव्यावसायावर देखील झालाय. गावातील दूध संकलन जवळपास 4 हजार लीटरने कमी झाल्याचे गावकरी सांगतात.


गेल्यावर्षी या गावात अतिवृष्टी झाली, त्यामुळे जनावरांचा चारा खराब झाला. यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला. एकूणच काय तर कर्ज काढून जनावरे खरेदी केली, मात्र चारा प्रश्नामुळे गावातील शेतकऱ्यांचा आणि दुग्ध व्यवसायिकांचं आर्थिक गणित पुरतं कोलमडल आहे. ज्याचा परिणाम इतरही व्यवसायांवरती झाल्याचं ग्रामस्थ सांगतात.


यंदा चांगला पाऊस होईल, या अपेक्षेतून अनेक शेतकऱ्यांनी 70 हजारांची गायी हे एक लाख ते दीड लाखापर्यंत खरेदी केली. मात्र याच गाईला सतत चारा मिळत नसल्याने दुधाचे उत्पादन घटल्याचे शेतकरी सांगतात. जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्यासाठी अन्य घटकांवर अवलंबून रहावे लागत आहे. काही ठिकाणी चढ्या किंमतीने ओला चारा मिळवावा लागत आहे. उत्पादन खर्च आणि दूध दरातील तफावत पाहता अनेक प्रश्न दूध व्यवसायिकांसमोर निर्माण झाले आहेत.


अहमदनगर जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात चारा नेण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. तरी देखील येऊ घातलेल्या दुष्काळाची चाहूल लक्षात घेता शासन प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून चाऱ्याचं नियोजन सरकारने करणे गरजेचे असल्याचं आदर्श गाव हिवरे बाजारचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी म्हटलं आहे.


पावसाने पाठ फिरवल्या शेतीचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक गणित बिघडलंय. त्यातच शेतीला जोडधंदा म्हणून उत्तम पर्याय असलेला दुग्ध व्यवसाय देखील चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवरती धोक्यात येतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासन प्रशासनांना यावरती गांभीर्याने विचार करून शेतकरी आणि दुग्ध व्यवसायिकांना आवश्यक ती मदत करणं गरजेचं बनलाय.