Children Meeting in Beed : ग्रामीण भागात अनेकदा आपण ग्रामपंचायत अंर्तगत ग्रामसभा (Gram Sabha) भरल्याचे पाहिले असेल. काही ठिकाणी महिलांची ग्रामसभा देखील भरल्याचे उदाहरण आहेत. मात्र, बीडच्या (Beed) एका गावात चक्क ग्रामसभा ऐवजी बालसभा भरल्याचे पाहायला मिळाले. ग्रामपंचायतीच्या वतीने या विशेष बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. तसेच अनेकांनी समस्या देखील मांडल्या. विशेष म्हणजे या सभेत आलेल्या मुद्यांवर ठराव देखील घेण्यात आले.
बीड तालुक्यातील आंबे सावळी येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामपंचायतीच्या वतीने या विशेष बाल सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. आंबे सावळी ग्रामपंचायत हे बीड जिल्ह्यात पहिली ग्रामपंचायत आहे, ज्यांनी या बालसभेचे आयोजन केलं होतं. या बालसभेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेतील समस्या आणि गावातील इतर समस्या सरपंचासमोर मांडल्या. यावेळी सरपंचांनी त्यांच्या समस्या जाणून घेऊन यावर तात्काळ तोडगा काढायला सुरुवात केली आहे.
गावातील समस्या आणि काही ठराव करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून ग्रामसभा घेतली जाते. यामध्ये गावाचा विकासाचा आराखडा मानला जातो. मात्र, आंबे सावळी ग्रामपंचायतीने एक नवा आदर्श उभा केला असून, विद्यार्थ्यांसाठी एक विशेष बाल सभा आयोजित केली होती. यामध्ये देखील अनेक ठराव घेण्यात आले. बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच अशी बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे या बालसभेची परिसरात जोरदार चर्चा होत आहे.
असे ठराव घेण्यात आले...
एखाद्या ग्रामसभेप्रमाणेच या बालसभेमध्ये विद्यार्थ्यांनी शाळेतील आणि गावातील प्रश्न ग्रामपंचायतसमोर मांडले होते. यामध्ये शाळेमध्ये वाचनालयाची उपलब्धता करून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर गावात नळ योजना आलेली असून, प्रत्येकाच्या घरी नळ असून त्या नळाला ग्रामपंचायतच्या वतीने तोटी बसून देण्यात यावी, त्याचबरोबर गावातील सांडपाण्याचं योग्य व्यवस्थापन ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात यावे असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतसमोर मांडले. विशेष म्हणजे, यावर ग्रामपंचायतीने ठराव घेतले असून, तात्काळ या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवायला सुरुवात देखील केली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीचं आदर्श घेऊन इतर गावांमध्ये देखील अशीच ग्रामसभा आयोजित केल्यास विद्यार्थ्यांना आपल्या समस्या मांडता येईल.
इतर महत्वाच्या बातम्या:
नवीन पिकांसह खते, बियाणाची माहिती देण्यासाठी आता प्रत्येक गावात ग्रामसभा भरणार; कृषिमंत्र्यांचे आदेश