Baramat Youth Geranium Success Story : हेमंत जगदाळे, वय वर्ष 30, शिक्षण इंजिनिअरिंग, व्यवसाय शेती... बारामती (Baramati) तालुक्यातील दुष्काळी पाट्यातील तरुण शेतकरी. हेमंत हा बारामती तालुक्यातील मुर्टी गावाचा तरुण. हेमंतने पारंपरिक शेतीला फाटा देत तीन वर्षांपूर्वी जिरेनियमसारख्या सुगंधी वनस्पती असलेल्या पिकाची एक एकरावर लागवड केली. जिरेनियम (Geranium) ही सुगंधी वनस्पती आहे. ज्याचा तेलाचा वापर हा कॉस्मेटिक तसेच अत्तर बनवण्यासाठी केला जातो. पहिल्याच पिकात नफा झाल्याने हेमंतने जिरेनियमचे क्षेत्र वाढवले सध्या हेमंतकडे दहा एकरावर जिरेनियमची लागवड केली आहे.  


बारामती तालुक्यातील मुर्टी हे दुष्काळी पट्ट्यातील गाव पण याच दुष्काळी गावात 30 वर्षीय हेमंत जगदाळे या तरुणाने जिरेनियमचे नंदनवन माळरानावर फुलवले आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हेमंतने शेती करण्याचा निर्णय घेतला. तीन वर्षांपूर्वी एका एकरावर जिरेनियमची लागवड केली. आज हेमंतकडे 10 एकर जिरेनियमचं पीक आहे. तसेच त्याने नर्सरी देखील सुरु केली आहे. यातून वर्षाकाठी हेमंत तब्बल 30 लाख रुपये कमावतो आहे.




सुरुवातीला एक एकरावर लागवड केल्यानंतर हेमंतला जिरेनियमचे तेल काढण्याचा प्रश्न निर्माण झाला त्यानंतर त्याने स्वतःचं तेल काढण्याचे युनिट देखील उभे केले. सध्या त्याच्या तेलाला बाजारात साडे अकरा हजार रुपये किलो एवढा दर मिळत आहे. तसेच जिरेनियम लागवड करताना दर्जेदार रोपांची लागवड करावी म्हणून हेमंतने नर्सरी देखील चालू केली आहे. आज याच रोपांना राज्यभरातून मोठी मागणी आहे.


जिरेनियमची दर चार महिन्याला छाटणी केली जाते. तसेच एकरी लागवडीचा खर्च हा 90 हजार ते 1 लाखाच्या दरम्यान येतो. पहिल्याच छाटणीत साधारपणे 80 ते 90 हजार मिळतात. वर्षातून जिरेनियम पिकच्या तीन छाटण्या होतात. पीक साधारणपणे तीन ते साडेतीन वर्ष चालते आणि एका एकरातून 3 वर्षात साधारणपणे 9 लाख रुपये मिळत असल्याचे हेमंत सांगतो. आज हेमंत जिरेनियमच्या पिकातून आणि नर्सरीतून वर्षाकाठी 30 ते 35 लाख रुपये कमावतो.




गेली 30 ते 35 वर्ष याच शेतात पारंपरिक शेती करणाऱ्या हेमंत याचे वडील सतीश जगदाळे यांचा पिकात उत्पादन खर्च देखील निघत नव्हता, त्याच माळरानावर हेमंत लाखोंचे उत्पादन घेत आहे. गेल्या तीन वर्षात जगदाळे कुटुंबियांची संपूर्ण परिस्थिती बदलून गेली. त्यामुळे हेमंतच्या वडिलांच्या मनात हेमंत बद्दल अभिमानाची भावना आहे.