Agriculture News : राज्यातील शेतकरी सातत्यानं विविध संकटांचा सामना करत असतात. कधी अस्मानी असतं तर कधी सुतलानी संकट येतात. भंडारा जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडले आहेत. भात पिकावर पडलेल्या किडींच्या प्रादुर्भावानं शेतकरी हवालदिल झाले आहेत. पिकावर पडलेल्या खोडकिडा, तुडतुडा, कडाकरपानं या रोगानं शेतकरी चिंतेत आहेत. यामुळं शेतकरी संतप्त झाले असून सरकारनं शेतात गांजा लावण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.


भंडारा जिल्ह्यातील हजारो हेक्टर भात शेती धोक्यात 


सप्टेंबर महिन्यात अवकाळी मुसळधार पावसानं ज्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्यापेक्षाही अधिक प्रमाणात नुकसान भात पिकावरील रोग, खोडकिडा, तुडतुडा आणि पाने गुंडळणाऱ्या अळीमुळं होत आहे. विविध प्रकारच्या रोगांनी भात पिकात थैमान घातल्यानं भंडारा जिल्ह्यातील हजारो हेक्टर मधील भातशेती धोक्यात आली आहे. त्यामुळं भातपीक उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पीक विमा काढणाऱ्या कंपनीकडून मोबदला मिळण्यासाठी सर्वेक्षण होणं गरजेचे आहे.  त्यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे. परिणामी आर्थिक विवंचनेत अडकलेला शेतकरी आता गांजा पिकाच्या शेतीची परवानगी सरकारनं द्यावी, अशी भंडाऱ्यातील शेतकरी करीत आहेत.


भारतात गांजावर पूर्णपणे बंदी


भारतात गांजावर पूर्णपणे बंदी आहे. तरीही लोक छुप्या पद्धतीने याची लागवड करतात. काहीजण व्यापार देखील करतात. त्याचे सेवन करतात. अशाप्रकारे, आपल्या देशात हजारो वर्षांपासून गांज्याचं सेवन केलं जातं. वर्ष 1985 पर्यंत गांजावर कुठल्याही प्रकारची बंदी नव्हती, पण राजीव गांधी यांच्या सरकारने 1985 मध्ये एनडीपीएस कायदा आणला. या कायद्यानुसार गांजावर बंदी घातली गेली. गांजाबद्दल बर्‍याच गोष्टी बोलल्या जातात. एकीकडे गांजाचे तोटे सांगणारे लोक आहेत तर त्याचे फायदे सांगणार्‍यांचीही संख्या बर्‍यापैकी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देशात गांजावरील बंदी हटविण्याची मागणी होत आहे. काही वेळेला तर शेतकऱ्यांनी गांज्याची लागवड करण्याची सरकारनं परवानगी द्यावी अशी देखील मागणी केली आहे. तर अनेकदा शेतकरी नेत्यांनी देखील शेतकऱ्यांना गांजा लागवडीसाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.


यावर्षी राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहीलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिकं वाया गेली आहेत, तर काही ठिकाणी पिक वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं शेतकरी संकटात सापडले आहेत. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं प्रमाण कमी आहे. त्यामुळं यंदा हाती उत्पन्न येण्याची शक्यता कमीच आहे. अशातच आता शेती पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. या रोगामुळे उरली सुरली पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं राज्यातील शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Jalna : जालन्यातील तुरीच्या शेतात लावलेल्या गांजाची मोजदाद, 2 कोटी 30 लाख किमतीचा 23 क्विंटल गांजा जप्त