Success Story  : शेती करत असताना शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागतो. कधी अस्मानी संकट असतं तर कधी सुलतानी. या सर्व संकटांवर मात करूनही काही शेतकरी उत्तम शेती करून लाखोंचा नफा मिळवत आहेत. एका अशाच शेतकऱ्याने डाळींब शेतीतून आर्थिक प्रगती साधलीय.
या शेतकऱ्यानं दोन एकर डाळींब शेतीतून 30 लाखांचं उत्पन्न घेतलंय.


सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील नांदोरे गावातील शेतकरी प्रताप भिंगारे यांनी दोन एकर क्षेत्रावर डाळींबाची बाग केली आहे. या बागेतून त्यांनी मोठा आर्थिक नफा मिळवला आहे. प्रताप भिंगारे यांनी डाळींब बागेचं उत्तम नियोजन केलं आहे. भिंगारे यांनी आपल्या डाळींब शेतीतून इतर शेतकऱ्यांसोर आदर्श मांडला आहे. पाहुयात त्यांची यशोगाथा.


प्रति किलो डाळिंबाला मिळाला 121 रुपयांचा दर


प्रताप भिंगारे यांनी दोन एकर क्षेत्रावर डाळींबाच्या बागेची लागवड केली आहे. दोन एकरात 900 झाडांची लागवड केली आहे. या बागेतून त्यांना डाळींबाचे 25 टन उत्पन्न निघाले. प्रतिकिलो डाळींबासाठी 121 रुपयांचा चांगला दर मिळाला. यातून प्रताप भिंगारे यांना तब्बल 30 लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. यातून त्यांची आर्थिक भरभराट झाली आहे.


पाण्याचे सूक्ष्म नियोजन, योग्य खतांची मात्रा


प्रताप भिंगारे यांच्या यशोगाथेबद्दल एबीपी माझाने त्यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी डाळींब शेतीच्या प्रयोगाबद्दल सविस्तर माहिती दिली. भिंगारे यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रावर भगवी जातीचं डाळींब लावले आहे. त्यानंतर त्यांनी बी एस सी अॅग्री असलेले शेती अभ्यासक अण्णा पाटील यांचे मार्गदर्शन घेतलं. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगारे यांनी डाळींबाच्या बागेला वेळेवर खतपाणी दिले. रासायनीक खतांबरोबर जैविक खते, शेणखत देखील बागेला टाकले. तसेच वेळेवर छाटणी केली. पाण्याचे सूक्ष्म नियोजन केले आहे. ड्रीप सिस्टीमद्वारे बागेला पाणी देत असल्याची माहिती शेतकरी प्रताप भिंगारे यांनी दिली.


डाळींबाला जागेवरच मागणी


प्रताप भिंगारे यांची बाग उत्तम आणि चांगली फळधारणा असल्यामुळे व्यापाऱ्यांनी जागेवर येऊन डाळींबाची खरेदी केली. शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीचा तोडणीचा खर्च करावा लागला नाही. जागेवरच व्यापाऱ्यांनी मालाची खरेदी केल्यामुळं प्रताप भिंगारे यांचा मोठा खर्च वाचला असून, त्यांना अधिकचा नफा मिळाला आहे. व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला प्रताप भिंगारे यांचा काही माल विक्रीसाठी बांगलादेशमध्ये पाठवला आहे. तर काही माल हैदराबाद आणि कोलकातामध्ये पाठवल्याची माहिती प्रताप भिंगारे यांनी दिली.


दोन एकर बागेवर झाकले कापड


अनेक ठिकाणी डाळींबाच्या बागांवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. यामुळं शेतकऱ्यांच्या बागाच्या बागा उध्वस्त होतात. हाती काहीच लागत नाही. या तेल्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रताप भिंगारे यांनी बागेची विशेष काळजी घेतली होती. भिंगारे यांनी आपल्या दोन एकर बागेवर कापड झाकले होते. यामुळं एकतर कडक उन्हापासून डाळींबाच्या बागेचं संरक्षण होतं आणि दुसरं म्हणजे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो.


महत्त्वाच्या बातम्या:


Success Story : क्षेत्र 40 गुंठे, उत्पन्न तीन लाख रुपये, फक्त दीड महिन्यात कोथिंबीर पिकातून शेतकरी मालामाल