Agriculture News : ऊस हंगाम सुरु होताना दरवर्षी एका प्रश्नाची चर्चा होते, ती म्हणजे थकलेली ऊसाची FRP. यावर्षी देखील काही कारखान्यांनी शेतकऱ्यांची (Farmers) ऊसाची FRP थकवली होती. ती हळूहळी कारखाने देत आहेत. केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत कारखान्यांनी 91.6 टक्क्यांपेक्षा जास्त ऊसाची थकबाकी शेतकऱ्यांना अदा केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत अदा केलेली ऊसाची थकबाकी ही कमी आहे. मागील वर्षी 99.9 टक्क्यांपेक्षा जास्त ऊसाची थकबाकी पूर्ण केली होती.
ऊस उत्पादक शेतकर्यांची (Farmers) थकित रक्कम देण्याच्या उद्देशाने, केंद्र सरकारने आवश्यकतेनुसार वेळोवेळी धोरणात्मक हस्तक्षेपाच्या स्वरुपात पावले उचलली आहेत. केंद्र सरकार ऊसाची रास्त आणि किफायतशीर किंमत (FRP) निश्चित करते. साखरेच्या भावातील घसरण आणि ऊसाची थकबाकी रोखण्यासाठी साखरेची किमान विक्री किंमत निश्चित करण्यात आली. मागील सात वर्षाच्या काळात केंद्र सरकारकडून कारखान्यांना 18000 कोटी रुपयांहून अधिक आर्थिक सहाय्य देण्यात आल्याची माहिती सरकारनं दिली आहे. त्यामुळेच कारखानदारांना साखर हंगाम 2014-15 ते 2020-21 या काळातील शेतकऱ्यांची थकबाकी देता आली.
अतिरिक्त साखर इथेनॉलकडे वळवल्यानं कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारली
अतिरिक्त साखर इथेनॉलच्या उत्पादनाकडे वळवल्यामुळे साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. परिणामी, त्यांना ऊसाची थकबाकी लवकर भरणे शक्य झाले आहे. या उपाययोजनांमुळे, मागील साखर हंगाम 2021-22 मधील, 99.9 टक्क्यांपेक्षा जास्त ऊसाची थकबाकी पूर्ण झाली आहे. चालू साखर हंगाम 2022-23 मधील, सुमारे 91.6 टक्क्यांहून अधिक ऊसाची थकबाकी पूर्ण झाली आहे. शेतकर्यांची ऊसाची थकबाकी देणे ही निरंतर प्रक्रिया आहे. दरम्यान, मागील पाच वर्षात ऊसाची थकबाकी सातत्याने कमी होत आहे.
नवीन MSP 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ऊसावरील एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 10 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. सरकारनं वाढवलेली एमएसपी नवीन ऊस हंगामापासून लागू होणार आहे. ही एमएसपी 1 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणार असून पुढील वर्षी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत लागू राहणार आहे. 2021 मध्ये ऊसाचा एमएसपी 5 रुपयांनी वाढवून 290 रुपये करण्यात आला होती. 2022 मध्ये त्यात 15 रुपयांनी वाढ करून 305 रुपये करण्यात आली. आता 10 रुपयांनी वाढ झाल्याने नव्या हंगामात उसाची एफआरपी 315 रुपये होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: