PM Modi Foreign Visit Cost : गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या परदेश दौऱ्यांवर (Foreign Visit) 254.7 कोटी रुपये खर्च झाले आहेत. सरकारने बुधवारी राज्यसभेत ही माहिती दिली. राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी  सांगितलं की, गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान मोदींनी केलेल्या परदेश प्रवासावर एकूण 2,54,87,01,373 रुपये खर्च झाले आहेत. राज्यसभेत आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी बुधवारी सांगितलं की, उपलब्ध माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांमध्ये पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावरचा खर्च 2,54,87,01,373 रुपये आहे.


पंतप्रधान मोदींचे परदेश दौरे


भाजपने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाची 9 वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या 9 वर्षातील नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे देखील गाजले. पीएम इंडियाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या तपशीलांनुसार, मोदी 2014 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यापासून 71 परदेश दौऱ्यांवर गेले आहेत.


या वेबसाईटवर मोदींच्या परदेश दौऱ्यांची यादी आहे, ज्यात जून 2014 मधील त्यांच्या पहिल्या परदेश दौऱ्यापासून गेल्या महिन्यातील अमेरिका आणि इजिप्तचा दौरा आणि या महिन्यातील फ्रान्स आणि यूएईला दौऱ्याचा तपशील देण्यात आला आहे.


पीएम इंडिया वेबसाईटवर उपलब्ध आकडेवारीनुसार, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी मे 2004 ते मे 2014 या काळात 73 देशांना भेटी दिल्या. नरेंद्र मोदींच्या परदेशातील दौऱ्यात अनिवासी भारतीयांशी संवादाचे कार्यक्रम देखील चर्चेत राहिले आहेत.


मोदींच्या परदेश दौऱ्यावर विरोधकांचा निशाणा


गेल्या नऊ वर्षांत मोदींच्या वारंवार होणाऱ्या परदेश दौऱ्यांवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अलिकडच्या काही महिन्यांत मोदींच्या परदेश दौऱ्यांवरही विरोधकांनी सवाल केले होते. या परदेश दौऱ्यांमध्ये उद्योजक गौतम अदानी मोदींसोबत किती वेळा होते, असे प्रश्न विरोधकांनी विचारले होते.


VIDEO : PM Modi Foreign Tour : पंतप्रधानांच्या परदेशवाऱ्यांवर 254 कोटींचा खर्च झाल्याची माहिती : ABP Majha