Sharad Pawar : सेंद्रिय आणि विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर (organic farming farmers) माझी केंद्रीय कृषिमंत्री आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) संवाद साधणार आहेत. रविवारी शरद पवार हे सांगोला दौऱ्यावर आहेत. यावेळी ते शेतकऱ्यांच्या विविध विषयांना वाचा फोडणार आहेत. याबाबतची माहिती महाऑरगॅनिक अँड रेसिड्यूफ्री फार्मर्स असोसिएशन अर्थात मोर्फाचे अध्यक्ष कषीभूषण अंकुश पडवळे यांनी दिली.


मोर्फा च्या वतीनं रविवारी ( 13 ऑगस्ट) रोजी सेंद्रिय आणि विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला खासदार शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित राहून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मोर्फा ही संस्था राज्यामध्ये सेंद्रिय आणि विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे संघटन आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या पातळीवर सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी आणि समस्यांचा पाठपुरावा शासन पातळीवर मोर्फा करत असते.


सेंद्रिय उत्पादनाचे अनन्य साधारण महत्व 


महाराष्ट्रात  हजारो शेतकरी सेंद्रिय आणि विषमुक्त शेती करतात. परंतू योग्य आणि किफायतशीर मार्केट मिळत नसल्यामुळं सदर सेंद्रिय शेती शेतकऱ्यांना परवडत नाही. मानवी आहारात सेंद्रिय उत्पादनाचे अनन्य साधारण महत्व आहे. पण सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही योग्य बाजारभाव मिळने गरजेचे आहे. भाव मिळत नसल्याने शेतकरी सेंद्रिय शेतीकडे पाठ फिरवत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी शासन पातळीवर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होणे अंत्यत गरजेचे आहे.


या विषयांवर होणार चर्चा


सेंद्रिय आणि विषमुक्त शेती तांत्रिक दृष्टीने परिपूर्ण करणे, असा माल निर्यात करण्यासाठी निर्यातीमध्ये सवलती देणे, निर्यातीच्या वाहतुकीमध्ये अनुदान देणे गरजेचे आहे. तसेच सेंद्रिय आणि विषमुक्त मालाचे तपासणी करण्यासाठीच्या लॅब मोठ्या प्रमाणावर उभा करुन त्याचा लाभ ग्राहकांना आणि शेतकऱ्यांना करुन देणं गरजेचं आहे. कारण विषमुक्त मालाची विश्वासार्हता आणि ट्रेसबिलिटी ही त्याच्या विक्रीशी संबंधित असल्यानं त्याबाबत शेतकऱ्यांनी सतर्क राहून आपला शेतीमाल उत्पादन केला पाहिजे असे अंकुश पडवळे म्हणाले. सदर सेंद्रिय आणि विषमुक्त शेतकऱ्यांच्या चर्चा संवादातून वरील विषयाला वाचा फोडण्यासाठी या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे अंकुश पडवळे यांनी सांगितले. यावेळी मोर्फाचे संचालक अमरजीत जगताप, हरिभाऊ यादव, जिल्हाध्यक्ष संजय दिघे उपस्थित होते.


महत्त्वाच्या बातम्या:


CM Eknath Shinde at Kaneri Math : सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकार सर्वोतोपरी मदत करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही