Agriculture News : विदर्भात मोठ्या प्रमाणात संत्र्यांचे उत्पादन घेतलं जातं. जागतिक बाजारात विदर्भातील संत्र्याला मोठी मागणी देखील असते. मात्र, सध्या विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटात सापडत असल्याचं चित्र दिसत आहे. मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यासारखा संत्र्याची निर्मिती विदर्भात होते. मात्र, निर्यात सुविधा केंद्राचा अभाव असल्यानं अडचणी येत आहेत.
विदर्भात दरवर्षी 12 ते 15 लाख मेट्रिक टन संत्राचे उत्पादन
कृषी अभ्यासक सुनिल चरपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात दरवर्षी 12 ते 15 लाख मेट्रिक टन संत्राचे उत्पादन होते. यामधील 30 टक्के संत्रा निर्यातक्षम असतो. संत्रा पट्ट्यात केवळ पाच संत्रा निर्यात केंद्र आहेत. सरकारनं एकही खासगी निर्यात सुविधा केंद्र निर्मित केलं नसल्याचे चरपे म्हणाले. 2019-20 पर्यंत 1.5 लाख मेट्रिक टन संत्रा बांगलादेशात निर्यात केला जायचा. बांगलादेश सरकारने 88 रुपये प्रति किलो आयात शुल्क आकारल्याने ही निर्यात सरासरी 65 हजार मेट्रिक टनावर आली आहे. संत्रा निर्यात करण्यासाठी काही महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आवश्यक असतात. मात्र, केंद्र व राज्य सरकारने तसेच स्थानिक लाेकप्रतिनिधी व नेत्यांनी अपेडा व एमएआयडीसीच्या माध्यमातून संत्रा निर्यात सुविधा केंद्रांच्या निर्मितीकडे लक्षच दिले नसल्याचे चरपे म्हणाले.
या महत्वाच्या सुविधांची निर्मिती करा
संत्रा निर्यात सुविधा केंद्रांतर्गत संत्र्याचे ग्रेडिंग, व्हॅक्स कोटिंग आणि पॅकिंग केले जाते. काोल्ड स्टोरेजची सुविधा करावी. संत्रा प्री कुल्ड बॉक्समध्ये पॅक केल्यानंतर ते बॉक्स एअर कुल्ड कंटेनरमध्ये ठेवून ते कंटेनर जहाजावर लोड करून संबंधित देशात पाठविले जातात. संत्र्याची सेल्फ लाईफ कमी असल्याने या सुविधा अत्यावश्यक आहे. संत्रा त्या देशातील बाजारपेठेत पोहोचेपर्यंत एकच एअर कुल्ड कंटेनर वापरावा लागतो. तसेच युरोपियन अथवा आखाती देशात संत्रा निर्यात करण्यासाठी एअर कार्गो अत्यावश्यक आहेत. संत्र्यासाठी ही सुविधा अद्याप उपलब्ध करून द्यावी. या देशांमध्ये जहाजाने संत्रा पाठवण्यास बरेच दिवस लागतात. प्री कुल्ड बाॉक्स आणि एअर कुल्ड कंटेनर किरायाने घ्यावे लागत असल्याने वाहतूक खर्च वाढतो. त्यामुळे संत्र्याची किंमती वाढत असल्याने वाहतूक खर्च कमी करणे आवश्यक असल्याचं मत कृषी अभ्यासकांनी व्यक्त केलं आहे. निर्यात सुविधा केंद्राचा अभाव ही देखील शेतकऱ्यांची मोठी अडचण आहे.
महत्त्वाच्या बातम्या: