Orange Export : बांगलादेशं (Bangladesh) घेतलेल्या एका निर्णयामुळ विदर्भातील (Vidarbha) संत्रा उत्पादक शेतकरी (Orange Farmers) आणि व्यापारी आर्थिक संकटात सापडला आहे. बांगलादेशमध्ये वैदर्भीय संत्र्यावर प्रति किलो 88 रुपये एवढे प्रचंड आयात शुल्क लावलं आहे. यामुळं विदर्भातील तब्बल अडीच लाख टन संत्रा शेतातच पडून राहण्याची भीती निर्माण झाली आहे.


विदर्भातील तब्बल अडीच लाख टन संत्रा शेतातच पडून राहण्याची भीती 


बांगलादेशमध्ये वैदर्भीय संत्र्यावर प्रति किलो 88 रुपये एवढे प्रचंड आयात शुल्क लावल्यामुळे विदर्भातील तब्बल अडीच लाख टन संत्रा शेतातच पडून राहण्याची भीती निर्माण झाली आहे. बांगलादेशी आयात शुल्क आणि त्याबद्दल केंद्र सरकारची उदासीनता लाखो संत्रा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना अडचणीत आणणारी आहे. लवकर याच्यातून मार्ग काढला गेला नाही तर भविष्यात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहव्या लागतील अशी भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे.


विदर्भातील हजारो संत्रा बागांमध्ये पिकलेल्या गोड, रसाळ संत्र्यापैकी तब्बल अडीच लाख टन संत्रा यंदा बाजारपेठेत जाण्याऐवजी शेतात पडून राहण्याची भीती निर्माण झाली आहे. कारण बांगलादेशाने भारतीय संत्र्यावर तब्बल 88 रपये प्रति किलो एवढं आयात शुल्क लावले आहे. 


टप्प्याटप्प्याने वाढत गेलेले बांगलादेशी आयात शुल्क


2019 - 20 रुपये प्रति किलो 
2020 - 30 रुपये प्रति किलो 
2021 - 51 रुपये प्रति किलो 
2022 - 63 रुपये प्रति किलो 
2023 - 88 रुपये प्रति किलो


बांगलादेशी बाजाराकडे व्यापाऱ्यांनी फिरवली पाठ 


गेल्या काही वर्षात सातत्याने वाढणाऱ्या आयात शुल्कामुळं सध्या बांगलादेशला एका ट्रकमध्ये 28 टन संत्रा पाठवण्यासाठी तब्बल 21 लाख रुपये आयात शुल्क म्हणून द्यावे लागत आहेत. त्यामुळं भारतीय व्यापाऱ्यांनी बांगलादेशी बाजाराकडे पूर्णपणे पाठ वळवली आहे. गेल्या काही वर्षात विदर्भातून बांगलादेशला संत्रा निर्यातीचा प्रमाण प्रचंड वाढले असून सध्या अडीच लाख टनापेक्षा जास्त संत्रा बांगलादेशला निर्यात होतो. मात्र, गेल्या काही वर्षात टप्प्याटप्प्याने वाढलेल्या आयात शुल्कामुळं आता या अडीच लाख टन संत्र्याला भारतीय बाजारपेठेतच खपवण्याची वेळ शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर आली आहे. 


62 रुपये किलोचा दर आता 62 रुपयांवर


भारतीय संत्र्याला बांगलादेशचे दार बंद झाल्यामुळं मागणी पुरवठ्याच्या सिद्धांताप्रमाणे भारतीय बाजारपेठेत संत्र्याचा पुरवठा वाढवून दर कोसळले आहेत. 19 ऑगस्टला हंगाम सुरू असताना असलेला 62 रुपये किलोचा दर देशांतर्गत बाजारपेठेत आता 20 ते 25 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील अनेक संत्रा निर्यातदारांनी कोट्यवधी रुपयांच्या संत्रा निर्यात प्लांटमध्ये संत्रा नेऊन प्रक्रिया करणे थांबविले आहे. निर्यात प्लांटपर्यंत संत्रा नेण्याचा खर्च परवडत नाही, म्हणून देशांतर्गत बाजारपेठेसाठी शेतावरच संत्र्याची पॅकिंग केली जात आहे.


भारतीय संत्र्याला अनुदान द्यावे, कृषी तज्ज्ञांची माहिती


दरम्यान,  केंद्र सरकारने हस्तक्षेप करून बांगलादेश सोबत बोलणी करून आयात कर कमी करून घ्यावे अन्यथा भारतीय संत्र्याला अनुदान द्यावे अशी मागणी कृषी तज्ज्ञ विजय जावंधिया यांनी केलीय. भारतातील अनेक पिकांना अशा पद्धतीने सरकारकडून निर्यातीसाठी अनुदान दिले जाते याची आठवण जावंधिया यांनी करुन दिली. 


लाखो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या काही वर्षात अनेक वेळेला तत्कालीन वाणिज्य मंत्र्यांना पत्र लिहून बांगलादेशने वाढवलेल्या आयात शुल्काचा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र, आश्वासन मिळूनही कृती होत नसल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. कुठेतरी वैदर्भीय शेतकऱ्यांचे दडपण राज्यकर्त्यांना नाही म्हणून असं होत असल्याची भावना संत्रा उत्पदकांमध्ये निर्माण होत आहे.


विदर्भातील तब्बल सहा लोकसभा मतदारसंघात संत्रा उत्पादक शेतकरी 


दरम्यान, विदर्भातील तब्बल सहा लोकसभा मतदारसंघात संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळं संत्रा उत्पादकांचा रोष येणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने सत्ताधारी भाजपला परवडणारा नाही.


महत्त्वाच्या बातम्या:


Success Story : आठ एकर संत्रा बागेतून 35 लाखांची कमाई, वाचा वाशिमच्या गोपाळ देवळेंचा यशस्वी प्रयोग