Agriculture News : सतत होणाऱ्या वातावरणातील बदलाचा परिणाम हळदीच्या पिकावर (Turmeric Crop) मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड केली जाते. शेतकरी या हळदीच्या पिकाला वर्षभर जपत असतात. परंतु, हेच शेतकरी आता संकटात सापडले आहेत. कारण हळदीच्या पिकावर मोठ्या प्रमाणामध्ये करपा रोगाच्या प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. त्यामुळे हळदीचा उत्पादनात 25 ते 50 टक्केपर्यंत घट होऊ शकते अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी  दिली आहे. 


भारतात सर्वाधिक हळदीच्या पिकाचे उत्पन्न घेणार जिल्हा म्हणून हिंगोली जिल्ह्याची ओळख आहे. हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात हळदीचे पीक घेतले जाते. मात्र हळदीचे उत्पन्न घेणारे शेतकरी संकटात सापडले आहे. त्याचं कारण म्हणजे वातावरणात होणाऱ्या बदलामुळे हळदीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यातील टेंभुर्णी गावात अशीच काही परिस्थिती सर्वत्र पाहायला मिळत आहे. या गावातील अनेक शेतकऱ्यांनी लावलेल्या हळदीचे पीक अक्षरशः करपून गेले आहे. उभं हळदीचे पीक शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर करपत आहे. विशेष म्हणजे याचा परिणाम हळदीच्या पिकाच्या उत्पन्नावर देखील होणार आहे. ज्यातून 25 ते 50 टक्के उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. याचा थेट आर्थिक फटका हळदी उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. 


करपा रोगाची माहिती कृषी विभागाला देण्याचे आवाहन 


हळदीच्या पिकाची उत्पन्न घेण्यात हिंगोली जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे. या जिल्ह्यात बाराही महिने हळदीचे पीक घेण्यात येते. त्यामुळे या जिल्ह्याला हळदीच्या पिकाची एक मोठी बाजारपेठ देखील समजली जाते. मात्र, यंदा या जिल्ह्यात हळदीच्या पिकाची मोठी घट होणार आहे. बदलत्या वातावरणामुळे हळदीच्या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. तर, हळदीच्या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळाल्यास तत्काळ कृषी विभागाला याची माहिती देण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


वातावरणात सतत बदल...


मागील काही दिवसांत वातावरणात सतत बदल होत आहे. कारण हिवाळा सुरु असतानाच अचानक अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. त्यामुळे वातावरणात होणाऱ्या बदलाचे परिणाम पिकांवर देखील होतांना पाहायला मिळत आहे. रब्बी हंगामातील अनेक पिकांना याचा फटका बसत आहेत. सोबतच हळदीच्या पिकाला देखील याचा फटका बसतांना पाहायला मिळतोय. वातावरण बदलामुळे पिकांचे होणारे नुकसान लक्षात घेता याचा शेतकऱ्यांना थेट आर्थिक फटका देखील बसत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


यूट्यूबच्या साथीनं शेतकऱ्यानं लावलं पैशाचं झाडं, ओसाड जमिनीत फुलवलं नंदनवन