Iran Missile Attack on Pakistan : नवी दिल्ली : Iran (Iran) पाकिस्तानमधील (Pakistan) दहशतवादी गटाच्या तळांवर एअरस्ट्राईक (Air Strike) केल्याचा दावा केला आहे. बलुचिस्तानमधील (Balochistan) पंजगुरमध्ये हा हवाई हल्ला करण्यात आला. जैश-अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या तळांवर हल्ला केल्याची माहिती इराणकडून देण्यात आली आहे. पाकिस्तानं इराणकडून करण्यात आलेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणनं म्हटलं आहे की, त्यांच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) नं पाकिस्तानमधील सुन्नी बलूच दहशतवादी गट जैश अल-अदलवर एअरस्ट्राईक केलं आहे. दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले आहेत. रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये तळ ठोकून असलेल्या या दहशतवादी गटानं पाकिस्तानच्या सीमा भागांत इराणी सुरक्षा दलांवर हल्ला केल्याचं बोललं जात आहे. पाकिस्तानमधील जैश अल-अदलनं इराणच्या दोन ठिकाणांवर हल्ले केले होते. दरम्यान, एकीकडे इस्रायल-हमास संघर्षामुळे मध्यपूर्वेत तणाव वाढला आहे, तर दुसरीकडे याचवेळी इराणनं पाकिस्तानवर केलेल्या एअरस्ट्राईकमुळे खळबळ माजली आहे. 


पाकिस्तानकडून इराणच्या हल्ल्याचा निषेध 


पाकिस्ताननं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे या हल्ल्याबाबत तक्रार केली आहे. इराणच्या हल्ल्याचा पाकिस्ताननं तीव्र निषेध नोंदवला आहे. तेहरानमध्ये इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर त्यांनी आपलं मत मांडलं आहे. याशिवाय पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन केल्याप्रकरणी एका इराणी राजदूताला परराष्ट्र मंत्रालयात बोलावण्यात आलं होतं.


एका पाकिस्तानी अधिकाऱ्यानं सांगितलं की, दहशतवाद हा या भागातील सर्व देशांसाठी एक समान धोका आहे, त्यासाठी आपण एकत्र काम केलं पाहिजे. दरम्यान, असे हल्ले चांगले शेजारी असल्याचा पुरावा देत नाहीत. यामुळे द्विपक्षीय विश्वास गंभीरपणे कमकुवत होऊ शकतो.


जैश अल-अदल गटाकडून एअरस्ट्राईक झाल्याची पुष्टी 


जैश अल-अदल गटानं इराणच्या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. इराणनं क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या मदतीनं हल्ला केल्याची माहिती जैश अल-अदल गटाकडून देण्यात आली आहे. इराणनं बलुचिस्तानच्या पर्वतीय भागांत जैश अल-अदल संघटनेच्या अनेक अतिरेक्यांच्या घरांना लक्ष्य केलं. किमान सहा ड्रोन आणि अनेक क्षेपणास्त्रांचा वापर करून हा हल्ला करण्यात आला.


या हल्ल्यात जैश अल-अदलच्या सैनिकांची दोन घरं उद्ध्वस्त झाली. त्याचे कुटुंबीय जखमी झाले. या हल्ल्यात दोन अल्पवयीन मुलांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यात एका अल्पवयीन मुलीसह दोन महिला जखमी झाल्या आहेत.


जैश उल-अदल काय आहे?


जैश अल-अदल हा इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील सुन्नी दहशतवादी गट आहे. या गटाला पीपल्स रेझिस्टन्स ऑफ इराण असंही म्हटलं जातं. पूर्वी हा गट जुंदल्लाह होता, परंतु 2012 मध्ये त्याचं नाव बदलून जैश अल-अदल करण्यात आले. या संस्थेची स्थापना 2002-2003 मध्ये झाली होती.