Agriculture News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांनी कांद्याचे लिलाव (onion auction) बंद ठेवले आहेत. याचा शेतकऱ्यांना (Farmers) मोठा फटका बसत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दादाजी भुसे (Dada Bhuse) यांची व्यापारी आणि विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. मात्र, ही बैठक निष्फळ ठरली आहे. व्यापारी कांद्याचे लिलाव बंद ठेवण्याचे मुद्यावर ठाम आहेत. उद्या दुपारी तीन वाजता येवल्यात व्यापाऱ्यांची पुन्हा बैठक होणार आहे. यामध्ये पुढचा निर्णय घेतला जाणार आहे. 


बैठकीची पाहिली फेरी निष्फळ 


 व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडल्याप्रकरणी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री दादाजी भुसे यांनी व्यापाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकील जिल्हाधिकारी आणि उपनिबंधकही उपस्थित होते. यावेळी व्यापारी आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मात्र, बैठकीची पाहिली फेरी निष्फळ ठरली आहे. बैठकीत कोणताच निर्णय झाला नाही. तुम्ही कोणत्या शेतकऱ्यांकडून किती कांदा खरेदी केला ? याची माहिती पुढील एक तासात जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करा तसेच रोजच्या व्यवहारांची माहिती देणे गरजेचे असल्याचे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी या बैठकीत नाफेड आणि NCCF च्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.


26 सप्टेंबरच्या बैठकीत व्यापाऱ्यांनी बाजू मांडावी, तोपर्यंत लिलाव सुरु करावेत


कांदा व्यापाऱ्यांचे बरेचसे निर्णय सरकारी पातळीवरचे धोरणात्मक निर्णय आहेत.
त्यावर इथे निर्णय होवू शकणार नाही. पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी 26 सप्टेंबरला याबाबत बैठक बोलावली आहे. तिथे व्यापाऱ्यांनी आपली बाजू मांडावी, तोपर्यंत लिलाव सुरू करावेत असे आवाहन मंत्री दादाजी भुसे यांनी व्यापाऱ्यांना केलं. गणेशोत्सव काळात कांदा लिलाव बंद ठेऊ नये, कारण यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याचे भुसे म्हणाले. 


नाशिक जिल्ह्यातील 17 बाजार समित्यांचे कांदा लिलाव बंद 


नाशिक जिल्ह्यात कांदा प्रश्न चांगलाच पेटला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा व्यापारी असोसिएशनकडून बंदची हाक पुकारण्यात आली आहे. यामुळं काल आणि आज दिवसभर कांदा लिलाव ठप्प झाल्यानं लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जे व्यापारी कांदा खरेदी करत नसतील अशा व्यापाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून त्यांचा परवाना निलंबित किंवा रद्द करण्याची कारवाई करावी, अशा सूचना जिल्हा निबंधकांकडून देण्यात आलेल्या आहेत. केंद्र सरकारने लागू केलेले निर्यात शुल्क कमी करावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनने बुधवारपासून बंद पुकारला आहे. बंदमुळे नाशिक जिल्ह्यातील 17 बाजार समित्यांचे कांदा लिलाव बंद आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या:


Nashik : कांदा खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाईचा बडगा, परवाना रद्द करा आणि गाळे ताब्यात घ्या ; जिल्हा निबंधकांचे आदेश