Agriculture News : देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate chnage) होत आहे. कुठं थंडीचा कडाका जाणावत आहे, तर कुठं ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, काश्मीर खोऱ्यात यावर्षी मोठी बर्फवृष्टीची शक्यता नसल्यानं गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम आणि श्रीनगरमधील शेतकरी देखील चिंतेत आहेत. कारण, काश्मीर खोऱ्यातील बर्फवृष्टी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असते. 


दीर्घकाळ बर्फवृष्टी न झाल्याने सफरचंद, जर्दाळूसारख्या पिकावर परिणाम होणार


बर्फवृष्टी हा उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीसाठी एकमेव सोर्स असतो. अशात संपूर्ण डिसेंबर आणि जानेवारी कोरडा जात असल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लेह लद्दाख परिसरात देखील यंदा बर्फवृष्टी नाही त्यामुळं तेथील शेतकऱ्यांना देखील अडचणी निर्माण होणार आहेत. दीर्घकाळ बर्फवृष्टी न झाल्याने सफरचंद, जर्दाळू, चेरीसारख्या फळांच्या पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. 


उन्हाळ्यात काश्मीर खोऱ्यात पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होण्याची शक्यता


सोबतच, उन्हाळ्यात काश्मीर खोऱ्यात पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कारण अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पश्चिमी चक्रावात कमकुवत झाला आहे. त्याच्या प्रभावामुळं बर्फवृष्टीत घट होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. दरम्यान, बर्फवृष्टी नसल्यानं पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. 


जम्मू काश्मिरात हिवाळ्यातही किमान तापमानात मोठी घट


जम्मू काश्मिरात हिवाळ्यातही किमान तापमानात मोठी घट झालेली नाही.  यामुळं यंदा काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टीच नसल्याचे चित्र दिसत आहे. जानेवारीत गुलमर्गमध्ये किमान तापमान साधारण उणे 7 ते 10 पर्यंत पोहोचत असते, मात्र पश्चिमी चक्रावाताचा प्रभावच मागील काही दिवसांपासून दिसत नसल्याने तापमानात वाढ होत आहे. गुलमर्गमधील किमान तापमान उणे 0.4 अंशांवर तर पहलगाममध्ये उणे 5 अंश सेल्सिअस आहे. कमकुवत पश्चिमी चक्रावातामुळे काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टी नाही. दरम्यान उद्या म्हणजे 16 जानेवारी आणि 24 जानेवारी दरम्यान पुन्हा एकदा कमकुवत पश्चिमी चक्रावाताची शक्यता आहे. 


2024 हे वर्ष देखील उष्ण ठरण्याची शक्यता


2023 हे सर्वात उष्ण वर्ष ठरल्याची माहिती जागतिक हवामान संघटनेकडून जाहीर करण्यात आली आहे. 2023 या वर्षात अल निनो आणि वातावरणीय बदलांमुळं 2023 च्या उत्तरार्धात अधिक उष्णता जाणवली. 2024 हे वर्ष देखील उष्ण ठरण्याची शक्यता, जागतिक हवामान संघटनेनं व्यक्त केली आहे. 2023 वार्षिक सरासरी जागतिक तापमान 1.45 ± 0.12 अंश सेल्सिअस पूर्व औद्योगिक पातळीपेक्षा अधिक असल्याचं स्पष्ट झालं आहे. पॅरीस करारात निश्चित केलेल्या मर्यादेच्या जवळ जागतिक तापमान आहे. वाढती उष्णता जगातील अनेक देशांवर सामाजिक-आर्थिक अडचणींचे प्रभाव टाकणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Weather Today : गारठा वाढणार! सर्वत्र दाट धुक्याची चादर, 'या' भागात पावसाची शक्यता