Paaru New Marathi Serial : छोट्या पडद्यावर सध्या वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या, विविध धाटणीच्या मालिका (Marathi Serials) सुरू आहेत. या मालिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरल्या आहेत. आता 'पारु' (Paaru) ही नवी मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेचा प्रोमो आऊट झाला असून प्रेक्षक आता मालिकेची प्रतीक्षा करत आहेत.
आपुलकीने वागणारी, मनसोक्त हसणारी, नितळ पारु
तिला आपण रानातली पारवळ म्हणू शकतो, मोराचं सतरंगी मोरपीस म्हणू शकतो, किंवा डोंगरातल्या वाहणाऱ्या झऱ्याचा मंजुळ नाद पण म्हणू शकतो. पारू काय नाही? तर पारू हे सगळं आहे. पारू खरंतर एक जग आहे. निरागस प्रेमाने भरलेली, उत्साहाने सळसळणारी, बारमाही वाहणाऱ्या नदीप्रमाणे खळखळत हसणारी, तुमच्या आमच्या प्रत्येकात दडलेली पारू. लवकरच पारु ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'पारु'चं कथानक काय? (Paaru Serial Story)
'पारु'ची गोष्ट आहे गावातून पहिल्यांदाच मोठ्या शहरात आलेल्या मुलीची. कित्येक वर्ष आपल्या वडिलांच्या पासून लांब राहिल्यानंतर आता वडिलांच्या सोबत राहायला शहरात आलेली पारू. गावावरून शहरात येताना पारू आपल्यासोबत गावाकडचं निरागसपणा घेऊन आली आहे. ती तिच्याबरोबर तिचा निसर्ग घेऊन आली आहे.
शहराच्या वेगाची जाणीव नसणारी, इथल्या माणसांच्या स्वभावाचा अंदाज नसलेली, जे मनात आहेत ते ओठांवर असणारी पारू. या शहराचा वेग तिला पकडता येईल का? इथल्या माणसांच्या मनाचा तिला ठाव घेता येईल का? तिच्या हळव्या मनाला समजून घेणारं, तिच्या हक्काचं कुणीतरी तिला या शहरात भेटेला का? हे सगळं आपल्याला या नवीन मालिकेत बघायला मिळेल.
शरयू सोनावणे दिसणार मुख्य भूमिकेत
'पारु' मालिकेचं पटकथा लेखन केलं आहे किरण कुलकर्णी यांनी तर संवाद लेखक इरफान मुजावर हे आहेत. मालिकेचे दिग्दर्शन करत आहेत राजू सावंत. यात नटखट अवखळ निष्पाप पारूची भूमिका साकारणार आहे 'शरयू सोनावणे'. तिच्या सोबत प्रमुख भूमिकेत असतील प्रसाद जवादे, मुग्धा कर्णिक, अनुप साळुंखे हे कलाकारदेखील आहेत. प्रेक्षकांचं मनोरंजन करायला पारु आता सज्ज आहे. लग्नानंतर प्रसाद जवादेने पारु या मालिकेच्या माध्यमातून दमदार कमबॅक केलं आहे.
संबंधित बातम्या