Agriculture News : अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तीन कोटी 18 लाखांचं अनुदान वितरीत, पुणे जिल्हा प्रशासनाची माहिती
अतिवृष्टीमुळं पिकांच्या नुकसानीसाठी तीन कोटी 18 लाख रुपयांची निविष्ठा अनुदान वितरीत केल्याची पुणे जिल्हा प्रशासनानं दिली आहे.
Agriculture News in Pune : अतिवृष्टीचा (Heavy rain) खूप मोठा फटका शेतकऱ्यांना (Farmers) बसला आहे. शेती पिकांचे मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. पुणे (Pune) जिल्ह्यातही परतीच्या पावसानं थैमान घातलं आहे. त्यामुळं सामान्य नागरिकांसह शेतकरी चिंतेत आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळं पिकांच्या नुकसानीसाठी तीन कोटी 18 लाख रुपयांची निविष्ठा अनुदान वितरीत केल्याची पुणे जिल्हा प्रशासनानं दिली आहे. अतिवृष्टीमुळं जून ते ऑगस्ट 2022 दरम्यान जिल्ह्यातील नऊ हजार 192 शेतकऱ्यांच्या दोन हजार 247 हेक्टर, 85 आर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं होतं.
राज्य शासनाच्यावतीनं निविष्ठा अनुदान म्हणून एकूण तीन कोटी 18 लाख 45 हजार रुपये रक्कम तालुक्यांना वितरीत करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये दोन हजार 179 हेक्टर. पाच आर वरील जिरायती पिके, 32 हेक्टर. 65 आर क्षेत्रावरील बागायती पिके तर 36 हेक्टर. 15 आर क्षेत्रावरील बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे केले. त्यानुसार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन नियमानुसार निधीची मागणी करण्यात आली होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीदेखील शेतकऱ्यांना तातडीनं दिलासा देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या होत्या.
जिरायत पिकांसाठी 13 हजार 600 रुपये, बागायती पिकांसाठी 27 हजार रुपये
नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये बाधित व्यक्तिंना केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषाच्या धर्तीवर राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून (एसडीआरएफ) मदत देण्यात येते. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे सुधारित दर राज्य शासनाकडून 13 मे 2015 च्या महसूल आणि वन विभागाच्या शासन निर्णयानुसार लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार 33 टक्के वा त्यापेक्षा अधिक झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टरी निविष्ठा अनुदान जिरायती पिकांसाठी 6 हजार 800 रुपये, बागायती पिकांसाठी 13 हजार 500 रुपये तर बहुवार्षिक पिकांसाठी 18 हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येते. अतिवृष्टीनं झालेले नुकसान लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जून ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात मदत करण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय 22 ऑगस्ट 2022 रोजी जारी केला. त्यानुसार जिरायत पिकांसाठी 13 हजार 600 रुपये, बागायती पिकांसाठी 27 हजार रुपये, बहुवार्षिक पिकांसाठी 36 हजार रुपये इतकी मदत तीन हेक्टरच्या मर्यादेत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे काम सुरू
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य शासनाकडे 1 जून ते ऑगस्ट अखेरच्या पिकांच्या नुकसानीबाबत अनुदानाची मागणी केली होती. त्यानुसार 1 कोटी 59 लाख 22 हजार रुपये प्राप्त झाले. दरम्यान वाढीव दरानं अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्यावर फरकाची रक्कम 1 कोटी 59 लाख 23 हजार रुपये प्राप्त झाली असून याप्रमाणे एकूण 3 कोटी 18 लाख 45 हजार रुपये अशी सर्व रक्कम तालुक्यांना वितरीत करण्यात आली आहे. वितरीत करण्यात आलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीनं देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: