Manikrao Kokate : राज्यात शिवसेना-भाजप महायुतीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या काळात एक रुपयात पीक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली होती. या योजनेला सर्वसमावेशक पीक विमा योजना (Crop Insurance Scheme) हे नाव देण्यात आले. यात केंद्र सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांचा वाटा राज्य सरकारकडून भरला जायचा. शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरुन अर्ज पीक विम्याचा अर्ज दाखल करता येत होता. मात्र, या योजनेत गैरव्यवहार झाल्याची अनेक प्रकरणे गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. यानंतर कृषी आयुक्तांच्या समितीने सरकारला ही योजना बंद करण्याची शिफारस केली आहे. आता याबाबत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे.
माणिकराव कोकाटे यांनी रविवारी (दि.26) नंदुरबार येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. पिक विमा योजना बंद होणार का? याबाबत विचारले असता राज्यात पिक विमा योजना ही बंद होणार नाही आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे. यात काही बदल केले जाणार आहेत, अशी माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई मिळालेली आहे. काही ठिकाणी चौकशी सुरू आहे. त्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
...म्हणून एसटी महामंडळ तोट्यात
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं एसटीच्या भाड्यात वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार एसटीच्या भाड्यात 14.95 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याबाबत विचारले असता एस टी महामंडळाच्या भाडेवाढीबाबत अजून कॅबिनेटमध्ये निर्णय झालेला नाही. कॅबिनेटमध्ये हा निर्णय होईल त्यानंतर शिक्कामोर्तब केले जाईल. एस टी महामंडळ सध्या तोट्यात आहे. सरकारने महामंडळात अनेक योजना सुरू केल्यामुळे महामंडळ तोट्यात आहे, असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले.
नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत काय म्हणाले कोकाटे?
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. नाशिकमधून गिरीश महाजन आणि रायगडमधून अदिती तटकरे यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, हा निर्णय स्थगित करण्यात आला. याबाबत विचारले असता मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर या विषयावर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री आल्यानंतर दोन-चार दिवसात नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार, असे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.
आणखी वाचा