तुम्ही लहान मुलांसोबत कारनं प्रवास करत असाल तर हे नक्की वाचा. कारण लहान मुलांची सुरक्षा गृहित धरण्याची प्रवृत्ती आपल्या अनेकांमध्ये असते. मात्र हा मुद्दा गंभीर आहे, आपल्या लहानग्यांच्या जीवाशी संबंधित आहे. त्यामुळे दुर्लक्ष नको!


1. लहान मूल मागेच पाहिजे!


लहान मुलीनं किंवा मुलानं कितीही हट्ट केला तरी त्यांना मागच्या सीटवरच बसवलं पाहिजे, आणि ते देखील 'चाईल्ड सीट'वरच. 'चाईल्ड सीट' नसेल तर पैशाकडे न पाहता तातडीनं खरेदी करा, आणि तोपर्यंत सीटबेल्टचा वापर करा.


2. 'चाईल्ड लॉक' वापरा


लहान मुलं प्रचंड उचापती असतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही. लहानग्यांना आतमधून कारचं दार उघडता येऊ नये म्हणून प्रत्येक गाडीत 'चाईल्ड लॉक' असतं. ते वापरण्यास विसरू नका.


3. मुलांना मांडीवर बसवू नका


हल्ली रील्स पाहून अनेक जण लहान मुला-मुलींना पुढच्या सीटवर बसून मांडीवर बसवतात. हे अतिशय चुकीचं आहे. अपघात झाल्यास एअरबॅगचा फटका बसून लहान मुलाचा मृत्यू होऊ शकतो.


4. 'सनरूफ' डोकं बाहेर काढण्यासाठी नसतं!


'सनरूफ' प्रकाश आत येण्यासाठी असतं, लहान मुलांच्या मजेसाठी नव्हे. त्यातून डोकं बाहेर काढणं हे चुकीचं आहे आणि नियमांच्या विरोधात सुद्धा. अचानक ब्रेक लावावा लागला तर लहान मूल गाडीच्या समोर फेकलं जाईल हे लक्षात ठेवा.


5. गाडी पार्क करताना काळजी घ्या


आजूबाजूला लहान मुलं असतील तर लगेच गाडी पार्क करणं सुरू करू नका. त्यांना बाजूला होण्यास सांगा, आणि कुणीतरी त्यांच्याकडे लक्ष देतंय याची खातरजमा करा. तसंच, तुम्ही देखील समोर आणि आरशात लक्ष ठेवा.


6. गाडी काढताना सावधान!


लहान मूल गाडीपाशी खेळतंय, आणि चालकाला हे माहीत नसल्यानं त्यानं गाडी सुरू केली आणि बालकाचा मृत्यू झाला, अशा अनेक घटना दुर्दैवानं घडल्या आहेत. त्यामुळे गाडी काढण्याआधी आजूबाजूला नीट पाहा. लहान मुलं असतील तर त्यांना सावध करा.


7. मूल दिसताच वेग कमी करा


अनेकदा सोसायटीत लहान मुलं खेळत असतात. ''त्यांनी माझी कार पाहिली आहे, आता ते मध्ये येणार नाहीत'' या भ्रमात राहू नका. ते लहान आहेत, मस्ती म्हणून अचानक काहीही करू शकतात. त्यामुळे कारचा वेग शक्य तेवढा कमी ठेवा.


8. गाडी चालवताना अधिक काळजी घ्या


कारमध्ये लहान मूल असेल तर अतिवेगाचा मोह अधिकच टाळला पाहिजे. कुणाशी वाद घालू नका, शांत राहा. कारमधील लहान मुलाची सुरक्षा (मग ते तुमचं असो किंवा आणि कुणाचं) ही तुमची जबाबदारी आहे हे नेहमी लक्षात ठेवा. 


-अमेय चुंभळे, एबीपी माझा