Abdul Sattar : अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं शेततऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. नुकसान झालेला एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नसल्याचे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केलं. याबाबतचे आदेश कृषी विभागाकडून अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आल्याचे सत्तार म्हणाले. आतापर्यंत 82 टक्के पंचनामे पूर्ण झाल्याचे सत्तार म्हणाले. शेतकऱ्यांची बियाणांमध्ये फसवणूक होणार नाही याची काळजी घेतली जाईल असेही ते म्हणाले. ठाण्यामध्ये कृषी विभागाची महा हंगामपूर्व बैठक घेण्यात आली. यावेळी सत्तार बोलत होते. 


महाराष्ट्रातील सरकार हे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तयार आहे. 1 रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा दिला जात आहे. 1 लाख 15 हजार शेतकऱ्यांना नमो योजनेचा लाभ देणारे महाराष्ट्र राज्य आहे. शेतकऱ्यांची बियाणांमध्ये फसवणूक होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे सत्तार म्हणाले. खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाचे भरारी पथक तैनात असणार आहे. त्यामुळे खतांचा काळाबाजार होणार नाही यासाठी विशेष दक्षता घेतली आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान कसे चांगले होईल यासाठी शिंदे सरकार प्रयत्न करत असल्याचे सत्तार म्हणाले.


अवकाळी पावसामुळं आंबा पिकाचे मोठं नुकसान


अवकाळी पावसामुळं आंबा पिकाचे मोठं नुकसान झालं आहे. आंबा नुकसान क्षेत्राबाबत पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. 82 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. परंतु अजून ही अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने त्यानंतर वस्तुनिष्ठ पंचनामे केले जातील असे सत्तार म्हणाले. कोकणातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटणार नाही ही दक्षता घेतली जाईल असे सत्तार म्हणाले.   


शरद पवार वरिष्ठ नेते, त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही


सध्या मुलांच्या तोंडी सुद्धा खोक्यांचा उल्लेख यायला लागलाय या शरद पवारांच्या वक्तव्यावर अब्दुल सत्तार यांनी बोलण्यास नकार दिला. शरद पवार वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही. त्यांनी या देशासाठी आणि राज्यासाठी मोठं योगदान दिलं आहे. अजित पवार काय बोलले असते तर त्याला मी उत्तर दिलं असतं असेही सत्तार म्हणाले. 


द केरळ स्टोरी करमुक्त करण्याची मागणी भाजपाकडून होत आहे. यावर अब्दुल सत्तार यांनी महाराष्ट्रात मराठी चित्रपट सर्वप्रथम करमुक्त करा अशी माझी अपेक्षा आहे. भाजपची मागणी कोणती असेल ती फडणवीससाहेब बघून घेतील असेही सत्तार म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरही सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यात कोणताही सत्तासंघर्ष नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि राहतील. 2024 च्या निवडणुकीनंतर सुध्दा तेच मुख्यमंत्री राहतील असे सत्तार म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या:


Nanded Rain Update : नांदेड जिल्ह्याला पावसानं झोडपलं, पाच दिवसांत 47 मिमी पावसाची नोंद; ओढे, नाल्यांना पूर